देशभरात सध्या आयपीएलचा माहोल सुरु आहे. अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील कामगिरी टी 20 विश्वचषकाचा संघ निवडताना पाहिली जाईल. आयपीएलची रनधुमाळी आणि विश्वचषकाची उत्सुकता सुरु आहे, यादरम्यान माजी निवड समिती अध्यक्ष वेंकटेश प्रसाद यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत, हार्दिक पांड्याला टी 20 विश्वचषकात स्थान मिळणार का? याची चर्चा सर्वाधिक सुरु झाली आहे.
वेंकटेश प्रसाद यांच्या मते, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संघात स्थान मिळालं तर हार्दिक पांड्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. सध्या टीम मॅनेजमेंटमध्ये सर्वाधिक चर्चा विकेटकीपर बॅट्समनची जास्त आहे. दरम्यान, वेंकटेश प्रसाद यांनी स्वत: भारतीय संघाच्या निवड समितीचं अध्यक्षपद भूषावलं आहे, त्यामुळे त्यांच्या या ट्वीटकडे जास्त गंभीरतेनं पाहिलं जातेय.
वेंकटेश प्रसाद यांनी आपल्या एक्स खात्यावर पोस्टमध्ये स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणतात, फिरकी गोलंदाजांविरोधात शानदार कामगिरी करण्यासाठी शिवम दुबे याची निवड, जगातील सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाज असल्यामुळे सूर्यकुमार यादव यालाही संघात स्थान मिळेल. त्याशिवाय रिंकू सिंह याला फिनिशर म्हणून निवडलं जावं. शिवम दुबे, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांना टी 20 विश्वचषकासाठी संघात स्थान दिल्यास टीम इंडियासाठी चांगलं राहिल. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संधी दिली तर फक्त विकेटकीपर फलंदाजाचीच जागा शिल्लक राहतेय, त्यामुळे टी 20 विश्वचषकासाठी निवड कशी केली जातेय, हे अतिशय रंजक आहे.
आयपीएलनंतर जून 2024 मध्ये टी 20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये महाकुंभाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकासाठी टीम निवडण्याची मुबा तारीख 1 मे पर्यंत आयसीसीने ठेवली आहे. रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयकडून एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. 25 मे पर्यंत संघात एक बदल करण्याची सूट देण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये कोण कशी कामगिरी करतो, याकडे भारतीय निवड समितीचं बारीक लक्ष आहे. टी 20 विश्वचषकासाठी टीम निवड करताना आयपीएलमधील कामगिरीही पाहिली जाईल.