अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून आठ तांसाच्या शिफ्टच्या मागणीमुळे ट्रोल होत आहे. या मागणीमुळे अनेक सिनेमांमधून तिला बाहेर पडावे लागले आहे. तरीसुद्धा दीपिकानं आपल्या मुद्द्यावरुन पिछेहाट केलेली नाही. दीपिकाआपलं स्पष्ट आणि परखड मत मांडत असते. अशातच सध्या दीपिकाची इन्स्टा स्टोरी चर्चेत आहे. दीपिका पादुकोणनं मुंबईतल्या वाढत्या प्रदुषणावर चिंता व्यक्त करत एक पोस्ट केली आहे.
दीपिका पदुकोणनं आज तिच्या इन्स्टाग्रामवर एक 'स्टोरी' शेअर केली, ज्यामध्ये तिनं मुंबईतील प्रदूषणाच्या समस्येकडे लक्ष वेधलं. तसेच, तिनं महापालिका अधिकाऱ्यांना या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, गुरुवारी मुंबईतील हवेचा निर्देशांक (AQI) 150 च्या वर गेल्याचं दिसून आलं. हा AQI आरोग्यासाठी हानीकारक असतो.दीपिकानं मुंबईतील प्रदुषणाच्या पातळीचा एक 'स्क्रीनशॉट' शेअर केला आहे. या फोटोसोबतच, तिनं शहराची महापालिका, अर्थात 'बीएमसी' (BMC) ला टॅग केलंय आणि अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. शहराच्या सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त करताना, या अभिनेत्रीनं लिहिलंय की, मुंबईत राहणाली लोक विशेषतः लहान मुलं, हवेची गुणवत्ता खालावत असल्यामुळे गुदमरत आहेत. त्यासोबतच "हे कसं योग्य असू शकतं?", असा प्रश्नही दीपिकानं उपस्थित केला आहे.
दीपिका पादुकोणपूर्वी रिचा चढ्ढा आणि सयामी खेर या अभिनेत्रींनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करुन मुंबईच्या दिवसेंदिवस खालावणाऱ्या हवेच्या गुणवत्तेवर चिंता व्यक्त केली होती.