आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रम रचले. आता या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ‘धुरंधर 2’ हा दुसरा भाग येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वीच या सीक्वेलवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. धुरंधरचे निर्माते आणि मुंबई महानगरपालिका यांच्यातील हा वाद आहे. या वादामागचं कारण म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान टीमकडून मोडण्यात आलेले नियम. ‘धुरंधर 2’च्या शूटिंगदरम्यान टीमने अनेकदा नियम मोडल्याचा आरोप मनपाने केला आहे.
बीएमसी अधिकाऱ्यांच्या मते, 'धुरंधर २' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं. यामध्ये सेटवर स्वयंपाकासाठी सिलेंडर गॅसचा वापर, तर दुसऱ्यांदा अधिकाऱ्यांना माहिती न देता शूटिंगचं ठिकाण बदलण्यात आलं. म्हणून, बीएमसी ए वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी स्टुडिओला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी उपमहानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहिलं आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
बीएमसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, स्टुडिओला राज्याच्या सिंगल-विंडो फिल्मिंग पोर्टलचा वापर करण्यापासून कायमस्वरूपी बंदी घालण्याचा प्रस्ताव असलेलं औपचारिक पत्र उपमहानगरपालिका आयुक्तांना (डीएमसी) पाठविण्यात आलं आहे. बीएमसीने आधीच निर्मितीची २५,००० रुपयांची सिक्यॉरिटी डिपॉजिट रक्कम जप्त केली आहे आणि १ लाख रुपयांचा अतिरिक्त दंड प्रस्तावित केला आहे. स्टुडिओला अद्याप अधिकृतपणे ब्लॅक लिस्ट केलं नसलं तरी, पुढील कारवाईसाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचं वृत्त आहे.
यापूर्वी, मुंबई पोलिसांनी चित्रपटाच्या लोकेशन मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. साऊथ मुंबईतील उच्च सुरक्षा असलेल्या फोर्ट परिसरात आवश्यक परवानगीशिवाय ड्रोन वापरण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. रिंकू राजपाल वाल्मिकीविरुद्ध १ फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, एका सीनच्या शुटिंगदरम्यान ड्रोनचा वापर करण्यात आला होता, परंतु त्याची अधिकृत परवानगी घेण्यात आली नव्हती. एफआयआरमध्ये म्हटलंय की, नियमांचं पालन न करता ड्रोन वापरण्यात आला होता.