बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. रणवीर सिंहच्या या चित्रपटाने जगभरात कमाईचा 800 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. परंतु जितकं या चित्रपटाचं कौतुक होत आहे, तितकीच चित्रपटावर टीकासुद्धा केली जात आहे. काहीजण या चित्रपटाला प्रचारकी असल्याचं म्हणत आहेत. अशातच हा चित्रपट आता कायदेशीर अडचणीत सापडला आहे. ‘धुरंधर 2’ या चित्रपटावरच बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.
चित्रपटावर बंदी का हवी आहे ?
तामिळनाडूमध्ये सध्या निवडणुकांचे वारे आहे, त्यामुळे तमिळनाडू राज्यात या चित्रपटाला विरोध केला जात आहे. हे प्रकरण थेट मद्रास उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, तमिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी मद्रास हायकोर्टात एक अपील दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
शीला नावाच्या एका वकिलाने तमिळनाडू राज्यातील विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत खंडपीठाकडे चित्रपटावर बंदीची मागणी केली. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात तीव्र राजकीय संदर्भ असून मतदारांच्या भावनांवर तो प्रभाव टाकू शकतो, असंही त्यात नमूद केलंय. या चित्रपटाचा आणि त्याच्या संवेदनशील कथेचा राजकीयदृष्ट्या निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता वकिलांनी अपिलात व्यक्त केली.
‘धुरंधर 2’ हा चित्रपट मतदारांवर प्रभाव टाकू शकतो, त्यामुळे तमिळनाडूमध्ये त्याच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी वकिलांनी केली आहे. दरम्यान सरन्यायाधीशांनी यावर औपचारिक याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यानंतरच कोर्टात याप्रकरणी सुनावणी होईल.