अभिनेता रणवीर सिंह सध्या चर्चेचा विषय बनला आहे. धुरंदर चा घवघवीत यशानंतर सगळीकडे रणवीर सिंह चा बोलबाला होता. दरम्यान त्यानंतर पुन्हा चर्चा सुरु झाली ती ‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरु झालेल्या वादावरून, हा वाद इतका वाढला कि रणवीर सिंहवर इंडस्ट्रीती बंदी आणली गेली. दरम्यान आता या सर्व विषयावर अभिनेत्याने मोठा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
‘डॉन 3’ या चित्रपटावरून सुरू झालेला वाद काही शांत होताना दिसत नाहीये. निर्माते टीपी अग्रवाल यांच्यानंतर आता खुद्द अभिनेता रणवीर सिंहने कोर्टात धाव घेतली आहे. रणवीरने थेट ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ला (FWICE) कायदेशीर नोटीस पाठवत त्यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. ‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीरने फेडरेशनला ही नोटीस त्याच्याविरोधात जारी केलेल्या ‘नॉन को-ऑपरेशन डायरेक्टिव्ह’ म्हणजेच असहकाराच्या आदेशाप्रकरणी पाठवली आहे. या फेडरेशनने त्याच्या सर्व सदस्यांना रणवीरसोबत यापुढे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये काम न करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रणवीरच्या कायदेविषयक टीमने 2 जून रोजी फेडरेशनला नोटीस पाठवली आहे. मात्र या नोटिशीत त्याने नेमकं काय म्हटलंय किंवा फेडरेशनकडे कोणती मागणी केली आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र यामुळे ‘डॉन 3’चा वाद आणखी चिघळला आहे.
रणवीर सिंहकडून मिळालेल्या या कायदेशीर नोटिशीनंतर FWICE ने 3 जून रोजी पत्रकार परिषद आयोजित करत आपली बाजू मांडण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त रणवीरच नाही तर याआधी ‘हम तुम्हारे हैं सनम’ या चित्रपटाचे निर्माते आणि IMPPA चे माजी अध्यक्ष टीपी अग्रवाल यांनीसुद्धा ‘डॉन 3’च्या वादात रणवीरचं समर्थन करत फेडरेशनच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. फेडरेशनने रणवीरविरोधात दिलेले निर्देश चुकीचे असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी या याचिकेत केली होती.