मोठी बातमी ! बिहारमधील दोन दशकांचं 'नितीश'राज संपुष्टात; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
मोठी बातमी ! बिहारमधील दोन दशकांचं 'नितीश'राज संपुष्टात; मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
img
वैष्णवी सांगळे
बिहारच्या राजकारणात बदलाचे वारे वाहत आहे. बिहारमधील दोन दशकांचं 'नितीश'राज संपुष्टात येत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली होती, जी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरली आहे. कारण, या बैठकीनंतर त्यांनी लोकभवन येथे जाऊन राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनामा दिला. 

बिहारचे उपमुख्यमंत्री भाजप नेते सम्राट चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होती. सम्राट चौधरी यांच्या घराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. ह्याच सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी काही वर्षांपूर्वी डोक्यावर फेटा बांधला होता आणि जोपर्यंत नितीश कुमार यांना हटवणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा काढणार नाही अशी खुनगाठ बांधली होती. आता, भाजपकडून त्यांनाच संधी देण्यात आली असून विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. 

नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत आहेत. त्यामुळे, बिहारमध्ये भाजपला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळणार असून बिहारमधील अशा चर्चा सुरु आहेत. बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात तयारी जोरदार सुरु आहे. बिहारमधील सत्ताधारी जदयू आणि भाजपनं मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतच बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्‍यांचं नाव निश्चित होणार होते.

बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावली असून सायंकाळी एनडीएच्या आमदारांची बैठक विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शिवराज सिंह उपस्थित होते. या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली असून तेच बिहारचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group