मुंबई : आयकर विभागाच्या माजी निरीक्षकाने केलेल्या तब्बल २६३ कोटी रुपयांच्या आयकर परतावा घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पतीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , पुरुषोत्तम चव्हाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घोटाळ्यातील रक्कम हवालाद्वारे परदेशात पाठविणे तसेच व्यवहारांचा पुरावा त्यांनी नष्ट केल्याचा ईडीचा आरोप आहे. चव्हाण यांना न्यायालयाने २७ मेपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
अटकेआधी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चव्हाण यांच्या घरी छापेमारी केली. त्यात काही मालमत्तांची कागदपत्रे, परकीय चलन आणि मोबाइल फोन इत्यादी जप्त करण्यात आले. या प्रकरणातील ही पाचवी अटक असून, चार दिवसांपूर्वी ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजेश बतरेजा या मुंबईस्थित व्यावसायिकाला अटक केली होती.
काय आहे घोटाळा ?
तानाजी अधिकारी ही व्यक्ती मुंबईत आयकर विभागात निरीक्षक पदावर कार्यरत होती. त्यावेळी रिफंड क्लेम जारी करण्याचे काम त्याच्याकडे होते. अधिकारीच्या वरिष्ठांच्या संगणकाचा लॉग-इन आयडी व पासवर्ड त्याच्याकडे होता. त्याद्वारे तो रिफंड जारी करत होता. या माध्यमातून त्याने त्याचा मित्र भूषण पाटील आणि राजेश शेट्टी यांच्या कंपनीत पैसे जमा केले.
नोव्हेंबर, २०१९ ते नोव्हेंबर, २०२० या काळात रिफंडच्या एकूण १२ प्रकरणांद्वारे त्याने तब्बल २६४ कोटी रुपये या कंपनीमध्ये वळवले. या २६४ कोटी रुपयांच्या रकमेतील ५५ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम राजेश बतरेजा या व्यक्तीने दुबई येथे वळवली आणि तेच पैसे भारतात दोन कंपन्या स्थापन करत त्यामध्ये गुंतवणूक केल्याचे दाखवले.