मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांची विश्वासू रवींद्र वायकर यांच्या जोगेश्वरी येथील घरी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) धाड टाकली आहे. ईडीच्या पथकाने आज सकाळी वायकर यांच्या घरावर धाड टाकली.
ईडीच्या या पथकात 10 ते 12 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी साधारण साडेआठच्या सुमारास ईडीचे पथक वायकर यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर वायकर यांच्या घरी ईडीची झाडाझडती सुरु आहे.
वायकरांशी संबंधित सात ठिकाणांवर ईडीची छापेमारी सुरु असून यामध्ये त्यांच्या भागिदारांच्या घरांचाही समावेश आहे. जोगेश्वरीतील भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीकडून ही धाड टाकण्यात आल्याचे समजते.
आता या धाडीत ईडीच्या हाती काही पुरावे लागतात का आणि त्या अनुषंगाने ईडी रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची कारवाई करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रवींद्र वायकर यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप केले होते.