मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावले आहे.ईडीने रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणी चौकशीचं समन्स बजावलं आहे. रोहित पवार यांनी येत्या बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहावे, असं समन्समध्ये म्हटलं आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यानंतर आता रोहित पवार यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं आहे.
रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने नुकतीच मोठी कारवाई केली होती. ईडीने रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली होती. यामध्ये बारामती अॅग्रोच्या पुणे आणि बारामती येथील कार्यालयांचादेखील समावेश होता. ईडीकडून कागदपत्रांची छाननी करण्यात आली होती. ईडीच्या या छापेमारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती.
संबंधित कारवाई झाली तेव्हा रोहित पवार हे विदेशात गेले होते. कारवाई झाल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी मुंबईत परतले होते. त्यांनी या कारवाईवरुन भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटावर टीका केली होती. पण आता त्यांना थेट ईडी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे.
बारामती अॅग्रो लिमिटेड हा एक उद्योग समूह आहे. रोहित पवार बारामती अॅग्रोचे सीईओ आहेत. तर त्यांचे वडील राजेंद्र पवार संचालक आहेत. पशू खाद्य हे बारामती अॅग्रोचं मुख्य प्रोडक्ट आहे. तसेच या कंपनीने पुढे साख उत्पादनही केलं. या कंपनीचे बारामती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 साखर कारखाने आहेत. दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री फार्म आणि चिकन व्यवसायही बारामती अॅग्रोद्वारे केले जातात.
नेमकं प्रकरण काय?
ईडी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलावात जी कारवाई राबवण्यात आली होती त्यावेळी बारामती अॅग्रो कारखान्याचा जो संबंध होता त्याप्रकरणी रोहित पवार यांची चौकशी केली जाणार आहे. विशेष म्हणजे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. “रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला होता. या प्रकरणी ईडीने चौकशी करावी”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ट्विटद्वारे केली होती. किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर ईडीने रोहित पवार यांच्या कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर आता त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्या आलं आहे.