मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेले जोगेश्वरी पूर्वचे आमदार आणि आता उत्तर पश्चिम मुंबईमधून लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या रवींद्र वायकर यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.
एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार रवींद्र वायकर म्हणाले की, त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले होते. त्यामुळे 'एकतर तुरूंगात जाणे किंवा पक्ष बदलने'असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होत.
शिवसेना फुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे काही खासदार, आमदार आणि पदाधिकारी राहिले होते, त्यापैकी रवींद्र वायकर हे एक होते. पुढे मार्च महिन्यात वायकर यांनी अचानकपणे ठाकरेंची साथ सोडली होती. ठाकरेंच्या शिवसेनेत असताना रवींद्र वायकर यांच्यावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून विविध आरोप करण्यात येत होते. त्याप्रकरणी वायकर यांची ईडी चौकशी झाली होती.
माझ्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा मला खूप धावपळ करावी लागली. मी खड्ड्यात होतो आणि त्यामुळेच मला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावे लागले. माझे आणि मातोश्रीचे गेल्या 50 वर्षांपासूनचे संबंध आहेत. जेव्हा आपल्या कुटुंबायांशी आपले नाते तुटते तेव्हा जेवढे दुःख होते तेवढेच दुःख मला झाले. त्यामुळे मला नियती कुठे घेऊन जात आहे तिथे मी जात आहे," असे वायकर म्हणाले.
रवींद्र वायकर हे गेल्या 35 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून वायकर 4 वेळा निवडूण आले आहेत. त्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून वायकर जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून विजयी होत आहेत. त्याचबरो 2014 ते 2019 या काळात त्यांनी राज्य मंत्रीमंडळात मंत्री म्हणूनही काम केले आहे.