सिटीलिंक बस चालक पुन्हा संपावर
सिटीलिंक बस चालक पुन्हा संपावर
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी):- विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देऊनही त्या मागण्या मान्य न झाल्याने सिटीलिंक बसचालकांनी आजपासून पुन्हा संप पुकारला आहे. अचानक झालेल्या या संपामुळे चाकरमान्यांचे व विद्यार्थ्यांचे हाल झाले.

महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या सिटीलिंक बस सेवेत वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. बसचालकांच्या मुळ वेतनात 12 हजारांची वाढ करण्यासह प्रोत्साहन भत्ता वाढवून देण्याच्या मागणीवर कंपनी प्रशासन आणि महापालिका परिवहन महामंडळाकडून अद्याप निर्णय न झाल्याने आजपासून वाहन चालकांनी पुन्हा संप पुकारला आहे. त्यामुळे शहराची बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. आज सकाळपासूनच शहरातून एकही बस धावली नाही त्यामुळे कामावर जाणारे कर्मचारी,  कामगार, विद्यार्थी वर्गांसह प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

नाशिककरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून महत्त्वाची ठरणारी सिटिलिंक बससेवा सुरू झाल्यापासून तीन वर्षात प्रशासनाच्या निष्काळजी व ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांना सुमारे 9 ते 10 वेळा संप पुकारावा लागला आहे. सद्य:स्थितीत कामगारांना मिळत असलेल्या मुळ वेतनात 12 हजार रूपये वाढ मिळावी, सध्या 26 दिवसांच्या हजेरीवर 700 रूपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो, तरी 24 दिवसांच्या हजेरीवर 1400 रूपये इतकी वाढ देण्यात यावी, अशाही मागण्या करण्यात आल्या आहेत. हा संप मनसे कर्मचारी संघटनेतर्फे पुकारण्यात येत आहे, असे सांगण्यात येत आहे. पगार थकल्याने नाशिक शहरातील सिटी लिंक बस सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून पुन्हा आंदोलन छेडले.

परिणामी सिटी लिंक बस सेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे. तपोवन बस डेपोतून आज शहरातील विविध भागात एकही बस धावली नाही. येथे सुमारे 150 बस उभ्या असून नाशिकरोड बस स्थानकातून मात्र काही प्रमाणात तुरळक बस धावल्याचे सांगण्यात येते.  

 दरम्यान विविध मागणी करत बस चालकांच्या प्रतिनिधींनी सिटीलींक कार्यालयात या संदर्भात प्रशासनाशी चर्चा केली. वेतन वाढीच्या मागणीसाठी पंधरा दिवसाची मुदत देण्यात आली होती. मात्र पंधरा दिवस उलटूनही याबाबत कोणत्याही निर्णय न झाल्याने वाहन चालकांनी संपाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. सुमारे 300 कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे आज सकाळपासून तपोवन डेपोतील शहर बस वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे सकाळपासून सिटी लिंकच्या सर्व बस तपोवन डेपोतच उभ्या आहेत. नाशिकरोड डेपोमधील बस सेवा काही प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

दोन वर्षात नऊ वेळा संप शहरात विविध भागातील कामगार, कर्मचारी, महिला ज्येष्ठ, नागरिक आणि विद्यार्थी या सर्वच प्रवाशांची वाहतुकीची सोय व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने सिटी लिंक व सेवा सुरू केली आहे मात्र या बस सेवेला वारंवार अडचणीत अडथळे निर्माण होत आहेत कधी चालक तर कधी वाहकांच्या संपामुळे ही बस सेवा वारंवार ठप्प होत आहे. गेल्या दोन वर्षात नऊ वेळा सिटीलिंग बस सेवा ठप्प झाल्याचे दिसून येते यापूर्वी दि. 1 सप्टेंबर 2022, 6 डिसेंबर 2022, 6 एप्रिल 2023, 11 मे 2023, 18 व 19 जुलै 2023, 4 ऑगस्ट 2023, 22 नोव्हेंबर 2023 तसेच फेब्रुवारी 2024 व 14 मार्च 2024 पासून असा नऊ वेळा संप पुकारण्यात आला आहे. दोन वर्षात नऊ वेळा संप होत असेल तर ठेकेदारावर कारवाई का होत नाही, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group