नाशिक : शहरात नाशिक महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या सिटीलिंक बससेवेतील बस चालक व वाहक नागरिकांशी असभ्य वागत असल्याने तसेच बस चालक वाहतुकीचे नियम न पाळता बेशिस्तीने बस चालवत असल्याने त्यांना शिस्त लावावी असे निवेदन राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. ( सिटीलिंक ) चे व्यवस्थापक वाघ यांना दिले.
नाशिक शहरात सिटीलिंकच्या माध्यमातून नाशिककरांसाठी बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु सिटीलिंकचे बसचालक बेशिस्तीने बस चालवत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. बस रस्त्यावर चालवताना लेनची शिस्त न पाळता एकाच वेळी शेजारी शेजारी बस चालविणे, रस्त्यात बस थांबवून इतर वाहनचालकांना रस्ता न देणे, बसथांब्यावर व्यवस्थित बस न थांबविणे, बसथांब्यापासून दूर थांबवणे, वेगाने गाडी चालवून इतर वाहनांना ओवरटेक करणे, रस्त्यावरील इतर वाहनांना कट मारणे, दुचाकी चलकांना दाबणे असे सर्रास प्रकार सिटीलिंकचे चालक करत आहेत. त्यांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहेत. तसेच बस वाहक बस प्रवाशीसोबत अरेरावी करत असून सुट्टे पैसे करिता वाद घालणे, महिला वर्गासोबत असभ्य वागणे, गर्दीच्या वेळी अरेरावी करणे असे प्रकार प्रत्येक बसमध्ये घडत आहे.
सिटीलिंकच्या ताफ्यातील बसमध्ये दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. नाशिक शहरातील नगरिकांकरीत सोयीच्या दृष्टीने बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, चालकांच्या वाढत्या बेशिस्तपणामुळे इतर वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच, या बसगाड्यांद्वारे शहरातील मुख्य रस्त्यांसह उपनगरीय भागांमध्ये वाहतूक कोंडीत भर पडत असून, इतर वाहनचालकांना या कोंडीतून काढताना मार्ग काढताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे बसचालकांना शिस्त लागण्याची गरज असल्याचे समोर आले आहे. मध्यवर्ती ठिकाण, मुख्य बाजारपेठा, शाळा-कॉलेज यामुळे अगोदर येथील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी असते. त्यातच सिटीलिंकच्या बेशिस्त चालकांमुळे या मार्गांवर मोठी कोंडी होत आहे.
एकंदरीत परिस्थिती बघता सिटीलिंक बससेवेतील सर्व वाहनचालक व वाहक यांना शिस्तीचे धडे देऊन बेशिस्त वाहनचालक व वाहकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, डॉ. संदीप चव्हाण, विशाल डोखे, संदीप गांगुर्डे, दिपक पाटील, रामदास मेदगे, संदीप खैरे, राहुल पाठक, अक्षय पाटील, रविंद्र शिंदे, सागर मोरे, सौरभ राठोड, मंगेश दरोडे, किशोर पवार आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.