नाशिक - शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ही मागणी मान्य न केल्याने प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांचे नेतृत्वाखाली राज्याचे कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर मशाल पेटवून आंदोलन करण्यात आले.
राज्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. त्यानंतरही ही कर्जमाफी झाली नाही म्हणून संतप्त झालेल्या स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने राज्य सरकारला यापूर्वी इशारा देण्यात आलेल्या होता.
परंतु राज्य सरकारने हा सर्व विषय गंभीरतेने घेतला नाही म्हणून शेतकरी संतप्त झालेले होते आणि अगदी अलीकडच्या काळामध्ये या विषयावर आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला होता.
आज रात्री 9 वाजेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू व स्थानिक कार्यकर्ते यांनी प्रथम मुंबई नाका येथे जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केले आणि त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक मधील निवासस्थानाबाहेर जाऊन मशाल पेटवून आंदोलन केले.
हे आंदोलन स्वाभिमानी संघटना माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर येथील घराबाहेर करणार होते परंतु हे आंदोलन त्यांनी नाशिकमध्ये केल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगली धावपळ उडाली.