प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये बसमधील १९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना मेक्सिकोच्या वायव्य सिनालोआ राज्यात मंगळवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास घडली.
अपघातामुळे महामार्गावरील वाहनांची वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.
मेक्सिकोच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अपघातग्रस्त बसमधून अंदाजे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करीत होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बस प्रवाशांना घेऊन उत्तर-पश्चिम सिनालोआ भागात आली.
हा किनारपट्टी भाग असून जो माझाटलान आणि लॉस मोचीस या समुद्रकिनाऱ्यावरील शहरांना जोडतो. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात एक ट्रक आला. या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला.
अपघातानंतर प्रवासी बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे बसमधील काही प्रवाशांना वेळेवर बाहेर पडता आलं नाही. या अपघाताची काही छायाचित्रेही समोर आली असून त्यात वाहनांचे तुकडे होऊन आग लागल्याचे दिसून येत आहे. अपघातानंतर तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या आणि जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.