महत्वाची बातमी : ऐन गणेशोत्सवात राज्यभरात एसटी बंद राहणार? उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन
महत्वाची बातमी : ऐन गणेशोत्सवात राज्यभरात एसटी बंद राहणार? उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन
img
Dipali Ghadwaje
ऐन गणेशोत्सव काळात लालपरीला ब्रेक लागणार असल्याने सामान्यांचे हाल होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्यापासून एसटी कर्मचारी संघटनेने राज्यभर बेमुदत आंदोलन पुकारले आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने उद्यापासून बेमुदत संप पुकारला आहे. 

एस टी कामगारांच्या आर्थिक मुद्यांची सोडवणूक तातडीने व्हावी यासाठी आज दि २ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यभर उग्र निदर्शने झाली तर उद्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. आज २ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १ः३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्या वतीने निदर्शने व द्वारसभा आयोजीत केली असून यावेळी सरकारला अंतिम इशारा देण्यात आला आहे.  अन्यथा तीन सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत संप पुकारला आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप 

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळायला पाहिजे, प्रलंबित महागाई भत्ता व फरक, वाढीव घरभाडे भत्ता व फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९/- कोटींमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या ५०००/-, ४०००/-, २५०० ऐवजी सरसकट पाच हजार मिळावेत, यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.

काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

  • खाजगीकरण बंद करा. 
  • सुधारीत जाचक शिस्त व आवेदन कार्यपद्धती रद्द करा.
  • इनडोअर व आऊटडोअर मेडीकल कॅशलेस योजना लागू करा.
  • जुन्या झालेल्या बस चालनातून काढून टाका व स्वमालकीच्या नवीन बस खरेदी करा.
  • चालक/ वाहक/कार्यशाळा व महीला कर्मचा-यांना अद्यावत व सर्व सुखसोईचे विश्रांतीगृह द्या. 
  • वेळापत्रकातील त्रुटी दूर करा. 
  • सेवानिवृत्त झालेल्या व होणा-या रा प कर्मचा-यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळण्यासाठी येणा-या अडचणी दूर करा. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयात संयुक्त घोषणा पत्रानुसार दुरूस्ती करण्यात यावी.
  • विद्यमान व सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये फरक न भरता वर्षभराचा मोफत पास द्या.
या व इतर मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी मंजूर कराव्यात, असे एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान, उद्यापासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ST Bus |
इतर बातम्या
Join Whatsapp Group