एसटी महामंडळाची आणखी एक भन्नाट योजना ; आत्ताच जाणून घ्या
एसटी महामंडळाची आणखी एक भन्नाट योजना ; आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
एसटी महामंडळाने उत्पन्न वाढविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहक यांना एसटीतर्फे रोख प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीचे उत्पन्नाचे उद्दिष्ट देऊन ते उद्दिष्ट पूर्ण करुन अतिरिक्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना उद्दिष्टांपेक्षा वाढीव उत्पन्नापैकी 20 टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात वाटण्यात येणार आहे. सदर रक्कम त्यांची कामगिरी संपवून आगारात आल्यानंतर त्याच दिवशी रोख स्वरूपात मिळणार आहे.

एसटी महामंडळाने आपले उत्पन्न वाढावे म्हणून विविध उपयोजना आणि अभिनव उपक्रम हाती घेतले आहेत. ‘प्रवासी राजा दिन’, ‘कामगार पालक दिन’ यासारखे उपक्रम राबवून प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच प्रत्यक्ष प्रवासात प्रवाशांना अडचण आल्यास आगार प्रमुखांचे दूरध्वनी क्रमांक प्रत्येक बसमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. याबरोबरच तोट्यातील आगारांना मार्गदर्शन करण्यासाठी पालक अधिकारी नियुक्त केले आहेत. इंधन बचतीसाठी चालक आणि यांत्रिक कर्मचारी यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पासचे वितरण करण्यात येत आहे. या सर्व उपाययोजनांमुळे एसटी महामंडळाने ऑगस्ट,2024 या महिन्यात 16 कोटी 86 लाख,61 हजार रुपये नफा मिळवला आहे.उत्पन्न वाढीत सातत्य राहण्यासाठी चालक-वाहक हा घटक अत्यंत महत्त्वाचा असून त्यांची कामगिरी चांगली व्हावी, त्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी वाढीव उत्पन्नावर आधारित प्रोत्साहन भत्ता योजना महामंडळाने सुरू केली आहे.

विशेष म्हणजे, प्रवासी तक्रार, प्रवाशांशी केलेली गैरवर्तणुक अथवा उत्पन्न वाढीसाठी अवैध मार्गाचा वापर केल्यास संबंधित एसटी चालक-वाहक यांना प्रोत्साहन भत्ता मिळणार नाही. असेही, महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे योग्य कामगिरी करणाऱ्या चालक-वाहकांना रोख स्वरुपात प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या योजनेस चांगला प्रतिसाद मिळाल्यास ही योजना पुढे चालू ठेवण्याबाबतही निर्णय घेण्यात येईल.
ST Bus |
इतर बातम्या
Join Whatsapp Group