पुणे : पुण्यात फातीमानगर भागात भीषण अपघात घडला आहे. एसटी बसने सात वाहनांना उडवले असून अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. भरधाव एसटीने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली आहे. पोलिसांनी एसटी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील हडपसर रस्त्यावर कायमच वर्दळ असत. या मार्गावर कायम वाहतूक कोंडी असते. दरम्यान, मंगळवारी रात्री या मार्गावर रामटेकडी येथे मोठा अपघात झाला. सांगोला ते स्वारगेट एसटी बस हडपसर येथील रामटेकडी पुलावरून रात्री फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात अपघात झाला बसमध्ये अपघाताच्या वेळी 30 प्रवासी यावेळी होते.
एसटी बस सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जात होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली.
या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अन्य सहा जण किरकोळ जखमी झालेत. पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतलंय. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.