New ST Bus Rules : खिशात 'हे' कार्ड असेल तरच मिळणार सवलत ! वाचा काय आहेत एस.टी.चे नवे नियम
New ST Bus Rules : खिशात 'हे' कार्ड असेल तरच मिळणार सवलत ! वाचा काय आहेत एस.टी.चे नवे नियम
img
वैष्णवी सांगळे
एस.टी.ने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही  ज्येष्ठ नागरिक, महिला किंवा विद्यार्थी असाल आणि एस.टी.च्या सवलतीचा फायदा घेत असाल, तर आता सावधान होण्याची वेळ आली आहे. कारण, आता केवळ ओळखपत्र दाखवून अर्ध्या तिकिटात प्रवास करण्याचे दिवस संपले आहेत. तुम्हाला यापुढे स्मार्ट कार्ड घ्यावे लागेल. कारण, राज्य सरकारकडून सवलतीत प्रवास करणार्‍यांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) आणले आहे. सवलतीत प्रवास करताना यापुढे फक्त ओळखपत्र दाखवून चालणार नाही, तर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड असायलाच हवं, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या स्मार्टकार्डबाबत केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पारदर्शकता आणण्यासाठी आणि बनावटगिरीला आळा घालण्यासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) प्रणाली बंधनकारक करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देताना स्पष्ट केले आहे की, यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ केवळ याच स्मार्ट कार्डद्वारे दिला जाईल. याचाच अर्थ असा की, जर तुमच्याकडे हे कार्ड नसेल, तर तुम्ही सवलतीसाठी पात्र असूनही तुम्हाला पूर्ण दराने तिकीट खरेदी करावे लागेल. जुन्या पद्धतीच्या ओळखपत्रांवर आता सवलत मिळणे कठीण होणार आहे

हे कार्ड केवळ प्रवासासाठीच नाही, तर एका डिजिटल वॉलेटप्रमाणे काम करेल. कार्ड सक्रिय ठेवण्यासाठी त्यामध्ये किमान 100 रुपयांचा बॅलन्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर गरजेनुसार 50 रुपयांच्या पटीत कितीही रिचार्ज करता येईल.  प्रवाशांना रिचार्जसाठी कुठेही लांब जाण्याची गरज पडणार नाही; बसमधील ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडे ही सुविधा उपलब्ध असेल. यामुळे प्रवासात सुट्या पैशांसाठी होणारी वादावादी आता कायमची थांबणार आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या स्मार्टकार्डबाबत सोशल मीडिया एक्स वर घोषणा केली. 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पोस्ट 

एस.टी. प्रवासाचा नवा डिजिटल युगारंभ

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या प्रवासात आता तंत्रज्ञानाचे नवे पाऊल टाकले आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे.
 
या प्रकल्पासाठी महामंडळाने मे. ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला असून, लवकरच सर्व आगारांमध्ये नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवासी, पुस्कारार्थी व पत्रकार आदींना या सेवेचा लाभ घेता येईल. एस.टी.चा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा टप्पा आहे. तिकीट हातात आणि सुट्या पैशांची चिंता या जुन्या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत. नव्या युगात, एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे. 

कार्डची वैशिष्ट्ये
- किंमत: नवीन कार्ड १९९ रुपये (GST सह). जुने स्मार्ट कार्ड जमा केल्यास १४९ रुपयांत उपलब्ध.
- वॉलेट मर्यादा: किमान १००  रुपये; ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज.
- रिचार्ज सुविधा: ईटीआयएम मशीन, अधिकृत संकेतस्थळ, मोबाईल ॲप किंवा नियुक्त एजंटकडून सहज रिचार्ज.
- नोंदणीसाठी व्यापक यंत्रणा: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी ३००० हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. 
- बसस्थानकांवरच नोंदणीची प्रक्रिया पार पडणार असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

ST Bus |
इतर बातम्या
Join Whatsapp Group