'गाव तिथे एसटी' असं ब्रीद घेऊन प्रवाशांसाठी झटणारे एसटी महामंडळाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
आर्थिक तोट्यातून बाहेर येण्यासाठी मागील काही काळापासून एसटी महामंडळाकडून महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. एसटी महामंडळाने आता आणखी एक गेमचेंजर प्लॅन तयार केला आहे. एसटी महामंडळ स्वत: वीज तयार करणार असून यामुळे तिजोरीवरील भार कमी होणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता हरित ऊर्जेकडे मोठे पाऊल उचलले आहे.
एसटीच्या विविध बसस्थानके, कार्यालये आणि आगारांच्या छतावर आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
१३ कोटींचा प्रकल्प
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, २.५७ मेगावॉट क्षमतेच्या या 'ग्रीड सोलर' प्रकल्पासाठी सुमारे १३.०३ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे एसटीच्या स्वतःच्या जागांचा वापर करून वीज निर्मिती केली जाईल, जी महामंडळाच्या विविध आस्थापनांसाठी वापरली जाणार आहे.
तिजोरीवरचा भार हलका होणार
सरनाईक यांनी पुढे सांगितले की, "या निर्णयामुळे एसटी महामंडळाच्या बसस्थानके, कार्यशाळा आणि कार्यालयांमधील वीज वापरात मोठी बचत होईल. दरवर्षी सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांचा पारंपरिक वीज खर्च वाचणार आहे," हा प्रकल्प केवळ आर्थिक बचतच करणार नाही, तर पर्यावरणपूरक पाऊल म्हणूनही महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अंमलबजावणीसाठी कडक सूचना
या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना तांत्रिक मान्यता आणि पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सौर ऊर्जेचा हा वापर महामंडळाला आत्मनिर्भर करण्यासोबतच 'हरित महाराष्ट्र' मोहिमेला बळ देणारा ठरेल, असा विश्वासही मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. यामुळे एसटीच्या आर्थिक शिस्तीत मोठे सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.