मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणारा मांजा काहींच्या जीवावर उठलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नायलॉन मांजामुळे काहींचा गळा चिरला गेला, तर नाशिकमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये पीएसआय गंभीर जखमी झाले आहे.
मांजावर प्रशासनाने कठोर पावलं उचलली असतानाही, अनेक ठिकाणी मांजाची सर्रास विक्री होतीय. ज्यामुळे नागरीकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नायलॉन मांजामुळे नाशिकमध्ये एका २३ वर्षीय युवकाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनू किसन धोत्रे असं युवकाचे नाव असून, तो नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील रहिवासी होता. या प्रकरणी आरोपीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत, नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरोधात ४ गुन्हे दाखल करत, ८ जणांना अटक केली आहे.
नाशिकच्या इंदिरानगर परिसरात नायलॉन मांजामुळे तरूणाचा मृत्यू झाल्याची बातमी ताजी असतानाच, येवल्यात नायलॉन मांजामुळे एक तरूण गंभीर जखमी झालाय. पारेगाव रोड परिसरात राहणारा दत्तू जेजुरकर असे तरूणाचे नाव असून, नायलॉन मांजामध्ये अडकून तरूणाच्या गळ्याला चिर पडली आहे. जखमेवर तब्बल ४५ टाके पडले आहेत. सध्या या तरुणाची प्रकृती गंभीर असून, येवल्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
तर दुसरीकडे भंडाऱ्यातील मोहगावात नायलॉन मांजा नागरीकांच्या जीवावर उठलाय. भंडाऱ्यातील तुमसर रोड उडान पुलावरून खाली उतरताना, मनोज या तरूणाचा पतंगाच्या मांज्यात अडकून अपघात झालाय. यात तरूणाचा गळा चिरला असून, मनोज गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान काही नागरिकांनी धाव घेत, मनोजला तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी मनोजवर उपचार केलं असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान नायलॉन मांजामुळे वाढत्या अपघात घटनांमुळे, पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरूवात केली आहे.