भगूरच्या रेणूकादेवी नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल
भगूरच्या रेणूकादेवी नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल
img
Dipali Ghadwaje
नाशिकरोड  (प्रतिनिधी) :- भगूर येथील रेणुका देवी मंदिर, रेस्टकॅम्प रोड येथे नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा भरते. त्यामुळे दि. 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधी रेणुका देवी मंदिर परिसरात वाहतुकीत सर्व जनतेच्या सोयीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे, तसेच वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला आहे. यासंदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जाहीर केली आहे.         

या अधिसूचनेनुसार रेस्ट कॅम्प रोड हा चिंतामणी चौफुली ते नाका नंबर 2 भगूरपर्यंत या मार्गावर सर्व प्रकारची स्वयंचलित वाहने, हातगाड्या, बैलगाड्या, सायकल व इतर सर्व प्रकारची मोटार वाहने यांना नवरात्रोत्सव काळात वाहतुकीसाठी दुपारी 2 ते रात्री 12 पर्यंत बंद राहील. त्याचप्रमाणे पर्यायी मार्ग मात्र खुला ठेवण्यात आला आहे.नवरात्रोत्सव कालावधीत प्रत्येक दिवशी व नमूद केलेल्या वेळेत भगूर गावाकडून देवळाली कॅम्पकडे व देवळाली कॅम्पकडून भगूर गावाकडे जाणाऱ्या एसटी बसेस, रिक्षा व इतर सर्व प्रकारची स्वयंचलित वाहने ही रेस्ट कॅम्प रोडवरील वाहतुकीसाठी जोशी हॉस्पिटल, स्नेहनगर, पेरूमल मार्ग, टेम्पल हिल रोड, जोझीला मार्ग, रेस्ट कॅम्प रोडवरील सेंट्रल स्कूल या मार्गाचा वापर करून नागरिकांना इच्छित स्थळी जाता आणि येता येईल.

हा मार्ग वापरण्याकरिता कमांडंट ऑफिसर स्टेशन हेडक्वार्टर देवळाली कॅम्प यांनी लेखी परवानगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका व अग्निशामक दलाची वाहने आणि या परिसरात राहणाऱ्या नागरिकांची वाहने यांना मात्र लागू राहणार नाही. वरील सर्व निर्बंध हे नवरात्र उत्सव कालावधीसाठी असून दि. 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत प्रत्येक दिवशी दुपारी 2 ते रात्री 12 पर्यंत अंमलात राहील, तसेच वरील मार्गातील वेळेत व परिस्थितीनुसार ऐनवेळी कोणतीही पूर्व सूचना देता बदल करण्याचा अधिकार देखील राखून ठेवण्यात आलेला आहे, असेही या संदर्भातील पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group