दांडिया आणि हृदयाचे आरोग्य....
दांडिया आणि हृदयाचे आरोग्य....
img
दैनिक भ्रमर

गेल्या काही वर्षांत भारतात विविध वयोगटांतील स्त्री पुरुष यांचा गरबा खेळताना किंवा खेळून झाल्यावर अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी आहे. गरबा हृदय कार्यात नेमका काय अडथळा निर्माण करतो, यावर थोडा विचार केला व थोडी काळजी घेतली, तर अशा दुःखद घटना आपण नक्की टाळू शकतो.

गरबा खेळताना तेथील वातावरण पवित्र, उत्साहवर्धक असते. उच्च स्वरातील संगीतसाथीने शेकडो, हजारो भाविक गरबा नृत्य करीत असतात. त्याची लय एकसारखी वाढत जाते व भाविक न थांबता बेभान होऊन नृत्य करतात. यात प्रामुख्याने गिरक्या व उड्या यांचा समावेश असतो. यात प्रचंड ऊर्जा खर्च होत असते. अशा वेळी जर त्या भाविकाला आधीच हृदयासंबंधी काही समस्या असतील, बीपीसारखा त्रास असेल, तर त्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. कारण या प्रचंड ऊर्जा खाणार्‍या कृतीने हृदयाला खूप काम करावे लागते. त्यामुळे त्याचे ठोके वाढतात, बीपी वाढतो व शरीराला जास्तीच्या ऑक्सिजनची गरज निर्माण होते. एवढ्या गर्दीत तो ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही व त्यातून दुर्घटना घडू शकते. गरबा नृत्यातून आरोग्यसंपन्न व्यक्तीसाठी एक प्रकारचा खूप छान व्यायाम होतो; पण तीच कृती हृदयासबंधी आजार असणार्‍याला गंभीर समस्येत टाकू शकते. प्रसंगी जीव गमावण्यापर्यंत वेळ येते.

हे टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाय करावेत.

भरपूर पाणी पिणे :  गरबा नृत्य करताना घाम येतो, शरीरातील पाणी कमी होते. यामुळे अररिथमिस (हृदयाच्या ठोक्याची नियमित असलेली लय बदलणे) होण्याची शक्यता खूप जास्त निर्माण होते व हृदयाचे कार्य अचानक थांबू शकते व कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊन उपचार मिळेपर्यंत व्यक्ती दगावू शकतो.
हे सर्व टाळण्यासाठी स्वच्छ पाण्याची बाटली जवळ ठेवावी व थोड्या थोड्या वेळाने पाणी पीत राहावे, शक्य असेल, तर लिंबू पाणी, ओआरएस किंवा इलेक्ट्रोलाईट्स ड्रिंक अधिक उपयुक्त ठरू शकते; परंतु सोडा व कोल्ड ड्रिंक हे टाळावे.

विश्रांतीचे मध्यांतर :  नवरात्र उत्सवात भाविक मित्रमंडळी, कुटुंबासह जात असतात. तेथे नृत्याचा आग्रह धरला जातो; पण जर व्यक्ती दिवसभराच्या कामाने थकला असेल, घाम येत असेल, शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवत असेल, चक्कर येत असेल, तर गरबा नृत्य प्रकार अगदी टाळावा व उपचार व विश्रांती घ्यावी. गरबा आयोजकांनीही मध्यंतर घेण्याची सोय ठेवावी.

पुरेशी विश्रांती व झोप :  नवरात्र काळ हा महिला वर्गाचा खूप धावपळीचा असतो, घराची स्वच्छता, नवरात्र स्थापना, कुमारिका पूजन, अखंड दिवा, फुलोरा आदी पारंपरिक गोष्टी कराव्या लागतात. त्यात पुन्हा उपासामुळे शरीर थकते व त्यात गरबा खेळल्यामुळे प्रचंड थकवा येऊ शकतो. म्हणून वेळेचे नीट नियोजन करून पुरेशी झोप व विश्रांती याकडे गंभीरपणें पाहिले पाहिजे.

काही टिप्स :  नवरात्र सुरू होण्याआधी काही दिवस गरबा सराव सुरू करावा, म्हणजे शरीराला त्याची सवय होईल.

उत्सव सुरू होण्याआधी आरोग्यतपासणी करावी व आपल्या नियमित गोळ्या घेण्यात खंड पडू देऊ नये. उपास, फराळ किंवा जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात.

गरबा ठिकाणी जाताना आपली वैद्यकीय फाईल व गोळ्या सोबत ठेवाव्यात.

वरील सर्व गोष्टी सांगण्यामागचा उद्देश एकच आहे, की नवरात्र उत्सवात खास करून महिला वर्ग खूप उत्साहात असतात. त्या देवीचा शृंगार, नैवेद्य, भजन, गरबा आदी जास्तीत जास्त लक्ष घालून व्यवस्थित करतात, तसेच त्यांनी थोडे आपल्या आरोग्याकडे पण लक्ष द्यावे, म्हणजे हा उत्सव अधिक छान व निर्विघ्न होऊ शकतो. सर्व भाविकांना माता कालिकेने आरोग्याचे वरदान द्यावे ही प्रार्थना.

- डॉ. प्रसाद अंधारे
एमडी, डीएनबी कार्डिओलॉजी
नाशिक व नंदुरबार, संपर्क : 7972889611, नाशिक 8484984133, नंदुरबार 9209474633.

इतर बातम्या
Join Whatsapp Group