मनपा कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान घोषित
मनपा कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान घोषित
img
Dipali Ghadwaje

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना वीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी घेतला आहे.

नाशिक महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना यावर्षी दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान देण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. करंजकर यांनी महानगरपालिकेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट, मुख्य लेखापरीक्षक गायकवाड व इतर अधिकार्‍यांबरोबर चर्चा करून यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये तीन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

याबाबत महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुट यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, की महानगरपालिकेच्या विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी करण्यात आली होती. सर्व संघटनांनी केलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून व मनपाच्या आर्थिक बाबीचा विचार करून सन 2022-23 मध्ये 15 हजार रुपये आणि दोन हजार रुपये वाढ करून देण्यात आली होती.

त्यामुळे यावेळी महानगरपालिकेच्या वतीने यामध्ये सन 2024-25 या चालू वर्षी 17 हजार रुपयांमध्ये तीन हजार रुपयांची वाढ करून (साधारणपणे 17.5 टक्के वाढ ) एवढी भरीव वाढ करून 20 हजार रुपये व शासन अनुदानातून वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांना 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत आयुक्त डॉ. करंजकर यांनी निर्णय घेतला आहे. लवकरच कर्मचार्‍यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग केली जाणार आहे, असेही दत्तात्रय पाथरुट यांनी सांगितले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group