महापालिकेच्या कामकाजाला दिशा आणि गती देणार नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली माहिती
महापालिकेच्या कामकाजाला दिशा आणि गती देणार नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली माहिती
img
Dipali Ghadwaje
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी)  : नाशिक महानगरपालिकेचे कामकाज करताना यापूर्वीची पॉझिटिव्ह कामे पुढे नेण्यासाठी, तसेच नाशिककरांच्या अडीअडचणी वेळेत सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यादृष्टीने पुढील आठवड्यात प्रत्येक विभागाच्या प्रमुखांकडून माहिती मागवली असल्याचे नाशिक महानगरपालिकेच्या नूतन आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

नाशिक महानगर विकास प्राधिकरणाच्या महानगर आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी सकाळी राजीव गांधी भवन मनपाच्या मुख्यालयात येऊन आपला प्रशासक तथा आयुक्तपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

मनीषा खत्री सकाळी बरोबर दहा वाजता नाशिक महापालिकेच्या मुख्यालयात आल्या, तेथून त्यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्तपदाचा खुर्चीवर जाऊन विराजमान झाल्या. त्यानंतर लगेचच मनपाच्या सर्व विभागीय अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. त्यांच्याशी शासकीय कामकाजाबाबत चर्चा केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या, की नाशिक महानगराच्या विकासासाठी बरीच कामे करायची आहेत. जी सध्या चालू आहेत आणि नव्याने काही कामे सुरू करायची आहेत, यावर आपण माहिती समजावून घेतली. जी महत्त्वाची अत्यंत गरजेची कामे आहेत, अशी स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ता, वाहतूक, वीज, आरोग्य व शिक्षण या प्रमुख कामांना प्राधान्य दिले जाणार आहे.

 या मूलभूत गरजा नागरिकांना देत असताना त्यांचा दर्जा कसा सुधारता येईल, याकरिता विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असून, त्यानंतर जनतेचा अभिप्रायही मागविला जाणार आहे. नागरिकांची मते आपल्यापर्यंत कशी पोहोचतील, या दृष्टीने ही रचना केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीच्या आयुक्तांनी जी कामे सुरू केलेली आहेत, आणि जी पॉझिटिव्ह आहेत, ती कामे पूर्णत्वाच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रखडलेल्या कामांवर लक्ष देताना ती रखडण्याची कारणे शोधून निधीचा उपयोग कसा झाला? निधीची कमतरता असेल किंवा काही अडचणीमुळे काम रखडले असल्यास शासनाच्या संबंधित विभागाची बोलण्यासाठीही प्राधान्य दिले जाणार आहे. महत्त्वाची कामे ठरवून एक एक करत ती पूर्ण केली जाणार आहेत. त्या दृष्टीने संबंधित विभागाच्या प्रमुखांना सूचनाही दिल्या आहेत. त्यांनी पुढील आठवड्यात चालू कामे, रखडलेली कामे आदी सविस्तर माहिती आपणापर्यंत पोहोचवावी, असा सूचना केल्या आहेत.

अधिकार्‍यांना स्वातंत्र्य देणार

त्याचबरोबर कामकाजात कुठे आणि कसे बदल करायचे आहेत, याबाबत लवकरच अभ्यास करून त्यावर योग्य निर्णय घेणार आहे. मनपातील कामकाजाबाबत काही पातळ्या ठरवून दिल्या जाणार आहेत. कारण प्रत्येक गोष्टही आयुक्तांपर्यंत यायला नकोत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच आल्या तर काम करणे सोपे होईल. छोट्या छोट्या कामाकरिता त्या त्या संबंधित विषयाच्या आणि विभागाच्या अधिकार्‍यांना निर्णय घेण्याविषयी अधिकाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
सिंहस्थ कुंभमेळ्याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, की कुंभमेळा हा इंदूरपेक्षाही अधिक चांगला व्हावा या दृष्टीने प्रयत्न असून त्याकरिता आपल्या हातात अजून दोन वर्षे आहेत. विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सिंहस्थ कुंभमेळ्याचे कामकाज केले जाणार आहे. शासनाचे मंत्री महोदय, सचिव यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच विभागीय आयुक्तांचा अनुभव आणि त्यांच्याकडे अतिशय वेगवेगळ्या व चांगल्या कल्पना आहेत, त्या अंमल आणण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय घेत काम केले जाईल.

कारभाराची चौकट बदलणार

नाशिक महानगरपालिकेमध्ये जे विभाग आहेत, त्यांच्या कामकाजाची पद्धत माहिती करून घेत त्यात आवश्यक ते बदल केले जाणार आहेत. एखाद्या कामाची फाईल अनेक टेबलावरून विनाकारण फिरून विलंब होत असेल, तर यापुढे त्या चार-पाच टेबलवर न फिरविता त्या एकमार्गी माझ्यापर्यंत कशा पोहोचतील, या दृष्टीने कामकाजाला एक दिशा व गती देण्यासाठी आपले प्राधान्यक्रम असल्याचे मनीषा खत्री यांनी सांगितले.

 नाशिक महापालिकेचे कामकाज करताना वेळेची मर्यादा पाळली जाणार असून, त्याकरिता सर्व्हिस अ‍ॅक्टच्या नियमानुसार प्रत्येक कामाबाबत वेळ ठरवून दिलेली आहे त्यावेळीनुसार संबंधितांचे काम वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न होणार असून, नागरिकांच्या तक्रारी ही कमी होतील यासाठी  अधिकार्‍यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले जाणार असल्याचे मनीषा खत्री यांनी सांगितले.

 नाशिकच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी आज आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच नाशिक महानगरपालिका राजीव गांधी मुख्यालयातील मरगळ काहीशी झटकल्यासारखे दृश्य दिसत होते. आज बर्‍याच दिवसांनी प्रथमच सकाळी दहाच्या आधी विविध विभागातील कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने मनपात वेळेत कामावर हजर असल्याचे दिसत होते. नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कारंजा हा अनेक दिवसांपासून बंद होता मागील वर्षी पुष्प महोत्सवानंतर क्वचित एक दोन वेळा सुरू झालेला हा कारंजा बंद स्थितीत होता मात्र आज नवीन आयुक्त मनीषा खत्री महापालिकेत येण्यापूर्वीच हा कारंजा सुरू करण्यात आल्याने नागरिकांबरोबर कर्मचार्‍यांनीही समाधान व्यक्त केले.

ई ऑफिसेस पद्धतीचा अवलंब

 पुढच्या आठवड्यात अभ्यास करून महापालिकेच्या अंतर्गत कामकाजातील दर्जा व पद्धत सुधारण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र जोरात सुरू असलेल्या ’ई ऑफिसेस’ पद्धतीचा अवलंब करणार असून ’ई एचआरएमएस’ या शासनाच्या सॉफ्टवेअर आम्ही वापरात आणणार आहे. तसेच प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी शासनानेच जे वेगळे सॉफ्टवेअर दिले आहे, त्याचा वापर करून कमी वेळेत अधिकाधिक दर्जेदार काम कसे होईल याकरिता मनपाच्या सर्वच विभागात दर्जा सुधारण्याचा प्रामुख्याने प्रयत्न असेल. वेगळे अन्य वेगळे कोणते सॉफ्टवेअर वापरणार नाही, कारण अधिकारी बदलल्यानंतर त्या सॉफ्टवेअरची कामकाज पद्धतही बंद पडते, असे लक्षात आले असल्याचे खत्री यांनी सांगितले.
शासनाच्या बजेट मॅनेजमेंट पीडब्ल्यूडी विभागाने बनविलेले आयटी सोल्यूशन, सॉफ्टवेअर आहेत तेच वापरणार आणि एक एक करीत सर्व विभागाच्या कामकाज पद्धतीत मुलाखत बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून त्या म्हणाल्या, की यामुळे कामकाजाला शिस्त लागेल व प्रॉपर  चॅनल प्रमाणेच कामकाज होईल. ई ही ऑफिस फाईल सेवा सुरू झाल्यानंतर ऑफलाइन फाईल्सची काही गरज राहणार नाही, असे कामकाज केले जाणार आहे.
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group