आगामी महापालिका निवडणुकीचे वारे सध्या जोरदार वाहत आहे.११ जूनपासून नाशिक महापालिका प्रशासन प्रभाग रचना तयार करण्याचे काम करत होते. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आरक्षण सोडत काढून पुढील प्रक्रिया केव्हा सुरु होईल याकडे इच्छुकांच्या नजरा लागल्या आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या एकूण १२२ सदस्यांची त्यात २९ चार व दोन तीन सदस्य प्रभाग रचनेला अंतिम मंजुरी मिळाली आहे. अंतिम रचना जाहीर झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाकडून त्वरित महिला ओबीसींसह इतर आरक्षणांची सोडत काढली जाणार आहे.
मतदानाची प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित व वेगवान पार पडावी यासाठी तांत्रिक पातळीवर काटेकोर व्यवस्थापन करण्यात येत आहे. नाशिक मनपाने प्रत्यक्ष मतदानासाठी ४००० ईव्हीएमची मागणी केली आहे. सुमारे १८०० मतदान केंद्रांवर या यंत्रांचा वापर होईल. मतदान प्रकियेसाठी ९,५०० पेक्षा जास्त कर्मचारी लागणार आहेत. यामध्ये शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी, महापालिकेच्या शाळांतील शिक्षक तसेच मान्यताप्राप्त खासगी शाळांतील शिक्षकांची मदत मनपा घेणार आहे.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर दिवाळीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक व इच्छुक प्रभागात अॅक्टिव्ह मोडवर आले आहेत.