२९ फेब्रुवारी २०२४
नाशिक (प्रतिनिधी):- नाशिक महानगर पालिका क्षेत्रातील बारा बंगला, गांधीनगर, नाशिकरोड, पंचवटी, निलगिरी बाग येथून पुरविला जाणारा पाणीपुरवठा तांत्रिक कामकाजामुळे शनिवार दि. २ मार्च रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवार दि. ३ माचे रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे.
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र येथे रॉ वॉटर पाईप लाईनमधून कनेक्शन करणे, तसेच ६०० मी. मी. व्यासाचे पवननगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणी आदी कामे करण्याचे नियोजन आहे.
ही कामे करण्यासाठी गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथील ओ साईडचे पंपींग बंद ठेवावे लागणार आहे.
यामुळे गंगापूर डॅम पंपींग स्टेशन येथून बारा बंगला जलशुध्दीकरण केंद्र, पंचवटी जलशुध्दीकरण केंद्र, निलगिरी बाग जलशुध्दीकरण केंद्र, गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र, तसेच नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथे होणारा पाणी पुरवठा शनिवार दि. २ मार्च रोजी बंद राहणार आहे.
तसेच रविवार दि. ३ मार्च रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी प्रमाणात कमी दाबाने होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करण्याचे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता (यांत्रिकी) यांनी केले आहे.
Copyright ©2024 Bhramar