१९ ऑगस्ट २०२३
नाशिक : राज्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये डोळ्यांची साथ येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. दरम्यान मुंबई, पुणे पाठोपाठ नाशिक शहरात डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात फैलावत असून, विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सहा हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शुक्रवारी (ता. १८) नव्याने २८२ रुग्णांची नोंद झाली. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास सक्तीने सुट्टी देण्याचे आवाहन शाळा प्रशासनाला केले आहे.
राज्यात डोळ्यांची साथ सुरू आहे. महापालिका हद्दीत मागील पंधरवड्यात मोठ्या संख्येने डोळ्यांचे रुग्ण वाढले आहे. महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन, बिटको, इंदिरा गांधी रुग्णालय तसे मोरवाडी येथील श्री. स्वामी रुग्णालयात आतापर्यंत ६०८२ डोळ्यांच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी आवाहन केले आहे.
महापालिकेकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू आहे. महापालिकेच्या सर्व शाळा, खासगी शाळा व कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांचे डोळे आले असल्याचे निदर्शनास आल्यास सक्तीने सुटी देण्यात यावी. जेणेकरून डोळे येण्याच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल.
शहरातील शाळांमध्ये नोडल ऑफिसरच्या माध्यमातून जनजागृती करावी. विद्यार्थ्यांना डोळे आले असल्यास सक्तीची सुटी देऊन रुग्णालयात, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन तपासणी करावी, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले.
Copyright ©2024 Bhramar