खरेदीसाठी मेनरोडला जाताय का? मग ही बातमी वाचा
खरेदीसाठी मेनरोडला जाताय का? मग ही बातमी वाचा
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या मेनरोड, शालिमार या परिसरात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याने शहर वाहतूक शाखेने या परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे. 

मेनरोड, शालिमार हा शहराचा मुख्य बाजारपेठ असलेला परिसर आहे. दिवाळीच्या निमित्ताने या परिसरात खरेदीसाठी मोठ्या संख्येने ग्राहकांची गर्दी होत असते. या पार्श्‍वभूमीवर शहर वाहतूक शाखेतर्फे दि. 25 पासून 3 नोव्हेंबर यादरम्यान सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत या परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी जारी केली आहे.

प्रवेश बंद मार्ग- मालेगाव स्टॅण्ड ते रविवार कारंजाकडे येणारी मालवाहू वाहनांसाठी प्रवेश बंद राहील. त्याचप्रमाणे दिल्ली दरवाजा ते धुमाळ पॉईंटपावेतो येणारी वाहने, रोकडोबा मैदान ते साक्षी गणेश मंदिरापर्यंतचा रस्ता, बादशाही कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, नेपाळी कॉर्नर ते गाडगे महाराज पुतळा, मेनरोड मार्गे धुमाळ पॉईंट, सांगली बँक सिग्नल ते धुमाळ पॉईंट, रविवार कारंजा ते धुमाळ पॉईंट या रस्त्यांवरून वाहनांना प्रवेशबंदी राहील.

पर्यायी मार्ग : या प्रवेशबंदीमुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरायचे आहेत. त्यानुसार मालेगाव स्टॅण्ड परिसरातून पुढे जाणारी वाहने ते मखमलाबाद नाका, रामवाडी, बायजाबाई छावणी, चोपडा लॉन्स. गंगापूर नाका मार्गे इतरत्र जातील.

पंचवटीकडून मेन मार्केटकडे येणारी वाहने द्वारका, दूधबाजार, भद्रकालीमार्गे इतरत्र जातील. सीबीएस, शालिमारकडून जुने नाशिक येथे जाणार्‍यांना शालिमार- खडकाळी सिग्नल- दूधबाजार मार्गे योग्य त्या ठिकाणी जाता येईल.

पार्किंगची सोय - प्रवेशबंदीमुळे या भागात येणार्‍या वाहनांसाठी सागरमल मोदी शाळा, शालिमार, तसेच बी. डी. भालेकर मैदान, गाडगे महाराज पुलाखाली व गोदाघाटावर वाहनचालक आपली वाहने पार्क करू शकतील.

वाहन प्रवेशबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी रविवार कारंजा, सांगली बँक सिग्नल, नेपाळी कॉर्नर, बादशाही कॉर्नर व गाडगे महाराज पुतळा कॉर्नर या ठिकाणी पोलिसांनी बॅरेकेटिंग केले आहे. तेव्हा वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group