वर्धा : खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला असून समोर येणाऱ्या ट्रक चालकाला झोपेची डुलकी लागल्याने ट्रक अनियंत्रीत होत लोखंडी बॅरिगेट तोडून थेट ट्रॅव्हल्सवर जाऊन धडकला. यात दोन जण गंभीर तर पाच किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार , पुण्याहून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी भाविक सकाळी मार्गस्थ झाले होते. दरम्यान विरुळ परिसरातून गेलेल्या समृद्धी महामार्गावर सदरचा अपघात पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास नागपूर कॉरिडॉर परिसरात झाला. ट्रक चालक लव शर्मा, क्लीनर रणजीत विश्वकर्मा (रा. छतरपूर, झारखंड) हे ट्रकमध्ये लोखंडी अँगल भरुन नागपूरकडून मुंबईकडे जात होते. धावत्या ट्रकमध्ये ट्रक चालकाला अचानक झोपेची डुलकी लागल्याने समृद्धी महामार्गालगचे लोखंडी बॅरिगेट तोडून ट्रक थेट नागपूर कॉरिडोरवर गेला.
हा ट्रक थेट प्रयागराजकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सवर जाऊन आदळला. या ट्रॅव्हल्समध्ये ३५ प्रवासी होते ते सर्व प्रयागराज येथे जात होते. अपघातात ट्रॅव्हल्स चालक रफिक खान (वय ३५) व क्लीनर रणजीत विश्वकर्मा हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ समृद्धीवरील रुग्णवाहिकेने रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
या अपघातात ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. तसेच लोखंडी पाइप रस्त्यावर अस्ताव्यस्त पडल्याने ते देखील बाजूला करण्यात आले.
अन्य भाविक पुढील प्रवासासाठी मार्गस्थ ट्रॅव्हल्समध्ये मनोहर भंडारे (वय ६२), धनलक्ष्मी भंडारे (वय ५६), श्रद्धा भंडारे (वय २७), विद्या केंडले (वय ५७), श्रीनिवास केण्डले (वय ६८), दर्शन पंडित (वय २२), महादेव अंबोले (वय ४६), वेणू गोलीपिल्ली ( वय ४०), स्वप्नील जगताप (वय २४), राहुल गौर (वय २४), अजय श्रीवास्तव (वय ३६), रवी गोलीपिल्ले (वय ४२), विकास माडी (वय ४०), गणेश रामनडी (वय ३५), सुरेश इरावती (वय ४२), अमित सरगर (वय २४) स्वामी पुल्ली (वय ४५), प्रकाश वर्से (वय ४४), गजानन बर्वे (वय ४२), संतोष सखपाळ (वय ४८), गणेश किर्ते (वय ३६), शिवम मिश्रा (वय ३६), महेश अंबोरे (वय ३८), श्रीकांत उम्मुखे (वय ३८) आदी प्रवाशांना पुढील प्रवासासाठी व्यवस्था केली असल्याची माहिती आहे.