मेहकर (भ्रमर वृत्तसेवा) :- अपघाताच्या मालिकांमुळे सतत चर्चेत येणार्या समृद्धी महामार्गावर पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करणार्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
समृद्धी महामार्गावर मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. यात जवळपास सोने व रोकडसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी पळवून नेला आहे. ही धक्कादायक घटना समृद्धी महामार्गावर कालरात्री साडेतीनच्या सुमारास घडली. यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचा मुद्दा समोर आला आहे.
समृद्धी महामार्गाने एक कुटुंब आपल्या एम एच १२- जे सी १९१९ क्रमांकाच्या कारने मुंबईकडे जात होते. या प्रवासादरम्यान रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास कार चालकाला झोप येत असल्याने त्यांनी काही वेळ विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मेहकरजवळील एका पेट्रोल पंपाजवळ गाडी लावून विश्रांती घेतली. यावेळी कारमध्ये एका महिलेसह पाच जण होते. काही वेळानंतर चार अज्ञात व्यक्ती त्या ठिकाणी आले आणि त्यांनी विचारपूस करण्यास सुरवात केली.
त्यानंतर या सशस्त्र दरोडेखोरांनी कारमधील चौघांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेले दागिने आणि पैसे मागण्यास सुरवात केली. या कुटुंबाचा नाइलाज असल्याने त्यांनी भयभीत होऊन त्यांच्याकडील ऐवज दरोडेखोराच्या स्वाधीन करून जीव वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख दोन लाख रुपये दरोडेखोरांच्या स्वाधीन केले. त्यांचा उद्देश सफल होताच त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
डोणगाव पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर घटना घडल्यावर काही वेळानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र, तत्काळ पोलिस मदत न मिळाल्याने सकाळ झाल्यानंतर या कुटुंबाने तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन गाठले आणि घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून सशस्त्र अज्ञात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.