उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. मात्र, या रेस्क्यू ऑपरेशन एकूण 17 दिवस उलटले आहेत. मात्र विविध प्रकारच्या अडथळ्यांमुळे रेस्क्यू ऑपरेशनवर वारंवार परिणाम होत आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आले आहेत. तेव्हा त्यांनी संवाद साधताना लवकरच बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले जाईल असं म्हटलं आहे.
उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेच्या बचाव कार्याबाबत मीडियाशी संवाद साधताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, "जवळपास 52 मीटर पाईप आत गेला आहे, 57 मीटर पाईप आत ढकलावा लागणार आहे. यानंतर आणखी एक पाइप लागणार आहे. पूर्वी ड्रिलिंग करताना स्टील वगैरे सापडत होते, ते आता कमी झाले आहे. आता सिमेंट काँक्रीट मिळत आहे, जे कटरने कापले जात आहे."
सर्व इंजिनिअर, विशेषज्ञ आणि इतर लोक त्यांच्या पूर्ण ताकदीने काम करत आहेत. आतापर्यंत पाईप 52 मीटर आत गेला आहे. ज्या पद्धतीने काम सुरू आहे, त्यात लवकरच यश मिळेल, अशी आशा आहे. पाईप गेल्यावर मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होईल. सगळे ठीक आहेत." बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना वाचवण्यासाठी मॅन्युअल ड्रिलिंग केल्याचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.
मॅन्युअल ड्रिलिंग सुरू असताना, पाईप ढकलण्यासाठी ऑगर मशीनचा वापर केला जात आहे. 41 कामगारांना वाचवण्यासाठी मदतीसाठी पाचारण करण्यात आलेल्या रॅट-होल खाण तज्ञांनी सोमवारी ढिगाऱ्यात हाताने ड्रिलिंग करण्यास सुरुवात केली. यासह, बोगद्याच्या वरच्या भागातून उभ्या ड्रिलिंगने आवश्यक 86 मीटर पैकी 36 मीटर खोली गाठली आहे.