देशात एकीकडे गुलाबी थंडी ची चाहूल लागली आहे, तर काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर भारतात थंडी पडण्यास सुरुवात झाली असून पहाटे आणि रात्री वातावरणात अधिक गारवा जाणवत आहे. येत्या काही दिवसात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिल्ली आणि लखनौ मध्ये पुढील पाच दिवस दाट धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. तर, पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ मध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
उत्तर भारतात गुलाबी थंडीची चाहूल
उत्तर भारतात थंडीची चाहूल लागली आहे. सकाळी आणि संध्याकाळी नागरिकांना आल्हाददायक थंडी जाणवत आहे. सकाळ-संध्याकाळ फिरायला बाहेर पडणारे लोकही हलके आणि उबदार कपडे घातलेले दिसतात. दरम्यान, येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढू शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसह देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली असून, त्याचा परिणाम मैदानी भागावर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या भागातील तापमान घसरू शकतं.
'या' भागात पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि त्रिपुरामध्ये 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच, काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या डोंगराळ भागातही आज पावसाची शक्यता आहे.
'तेज' चक्रीवादळ संदर्भात IMD चा इशारा
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळ तयार झालं आहे. सध्या चक्रीवादळ 'तेज' उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे, 'तेज' चक्रीवादळ संदर्भात हवामान विभागाने मच्छिमारांसाठी अॅडव्हायझरी जारी करण्यात आली आहे. मच्छिमारांना अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. 25 ऑक्टोबरपर्यंत दक्षिण-पश्चिम अरबी समुद्रात आणि 25 ऑक्टोबरच्या रात्रीपर्यंत पश्चिम मध्य अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभाग (IMD) ने जारी केला आहे.