उत्तराखंडमधून भीषण बस अपघाताची घटना समोर आली आहे. नैनितालमध्ये सुमारे ३२ प्रवासी घेऊन निघालेली हरियाणाची स्कूल बस काळाढुनगी रोडवरील नालनी येथे दरीत कोसळली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २९ जणांना वाचवण्यात यश आले आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, हरियाणाच्या हिसारमधील शाहपूर गावात असलेल्या न्यू मानव इंटरनॅशनल स्कूलमधील ३४ जण शनिवारी नैनितालला आले होते. रविवारी घरी परतत असताना त्यांच्या बसचा नैनितालच्या घटगडजवळ रविवारी (८, सप्टेंबर) भीषण अपघात झाला.
या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला, तर 24 जण जखमी झाले. सर्व जखमींना हल्द्वानी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये ५ महिला कर्मचारी आणि एका मुलाचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच एसडीआरएफच्या बचाव पथकांनी पोलिसांसह संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि बसमधून जखमींना बाहेर काढत आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले.
दरम्यान या बसमध्ये शिक्षक, शाळेचे कर्मचारी आणि काही मुलेही प्रवास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.