शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
img
वैष्णवी सांगळे
केरळममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना केरळममध्ये घडली आहे. शशी थरुर हे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली. थरुर यांचा ताफा तिरुवल्ली चेल्लिथोडू पुलाजवळ थांबवण्यात आला आणि त्यांच्या बॉडीगार्डला बाहेर काढून मारहाण करण्यात आली. 

समोर आलेल्या माहितीनुसार, केरळमच्या मलप्पुरम जिल्ह्यात ही मारहाणीची घटना घडली. वांडूर येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमाला जात असताना तिरुवल्ली चेल्लिथोडू पुलाजवळ आठ जणांकडून त्यांचा ताफा थांबवण्यात आला. शशी थरूर पहिल्या वाहनात होते. अचानक दोन वाहनांमधून आलेल्या सुमारे आठ जणांनी थरूर यांचे वाहन रस्त्याच्या मधोमध जबरदस्तीने थांबवले. हल्लेखोरांनी वाहनाला पुढे जाण्यापासून रोखले आणि कारच्या खिडक्यांवर हातांनी ठोठावायला सुरुवात केली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच  पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.  पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून, या घटनेत वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. कालिकावू येथील रहिवासी असलेल्या उम्मारा यांच्या विरोधात अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा हल्ला पूर्वनियोजित होता की रस्त्यावरील वादातून घडला, याचा तपास पोलीस आता करत आहेत. दरम्यान, केरळम विधानसभेच्या १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून, मतमोजणी आणि निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहेत. यावेळी राज्यात एलडीएफ, यूडीएफ आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group