‘‘खोके द्या, फोडा आणि राज्य करा, असे पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात केले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविणारे व शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यास लावणाऱ्या मोदींना महाराष्ट्रात मते मागण्याचा नैतिक अधिकारच नाही,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात केली. ‘‘महाराष्ट्रात मोदींच्या जेवढ्या सभा होतील, तेवढाच फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होईल,’’ असा दावाही त्यांनी केला. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पटोले पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी टीका केली. यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, रमेश बागवे, कमल व्यवहारे आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, ‘‘राज्यातील वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजेच काँग्रेसची गॅरंटी कार्डला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. उमेदवार कोणीही असो जनता महाविकास आघाडीला मतदान करत आहे. ही निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे;
लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे; परंतु मोदी हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी करण्याचा प्रयत्न करत आहेत. कांदा निर्यातबंदीवर बोलत नाहीत, केवळ गुजरातमधून कांदा निर्यात केला जातो. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जातात, त्यावर ते काही बोलत नाही. एक रुपयाची पीक विमा योजना फसवी ठरली. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. असे अनेक मुद्दे आहेत, त्यावर त्यांनी बोलले पाहिजे. परंतु केवळ नेहरू-गांधी परिवारावरच ते बोलत आहेत.’’ इंडिया आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार राहुल गांधी आहेत, असे सांगून पटोले म्हणाले, ‘‘यावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे. प्रचारातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधी यांच्या नावाने मते मागत आहेत.’’
पटोले म्हणाले
इंडिया आघाडीने हिंदू-मुस्लिमचा उल्लेख न केल्यामुळे भाजपला त्रास
भाजपमध्ये नेते निर्माण होत नाहीत, म्हणून आमचे नेते फोडत आहेत
भाजप नेत्यांनी घरात भांडणे लावून राज्यात असंस्कृत राजकीय व्यवस्था निर्माण केली
महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान भाजप नेत्यांनी केले