मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी सुर केली आहे. याचदरम्यान, काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे.
विधानसभेसाठी काँग्रेसने राज्यातील सर्व २८८ जागांवर तयारी सुरु केल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. यामुळे विधानसभेपूर्वीच महाविकास आघाडी बिघाडी झाली का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक येत्या दोन तीन महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांमध्ये जागावापट आणि जागांची चर्चा सुरु झाली आहे. या निवडणुकीवरून राजकीय पक्षांमध्ये जागांवरून हेवेदावे सुद्धा सुरु झाले आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी २८८ विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक घेऊन कामाला लागण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु झाली आहे, असं वक्तव्य केलं आहे.
एकीकडे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी एकत्र लढण्याचे आवाहन केले होते. तर दुसरीकडे नाना पटोले यांनी निवडणुकीबाबत वक्तव्य करत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. या सर्व राजकीय घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.