लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जवळ आलेली असतानाही महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाड्यांमधील जागावाटपाचा तिढा सुटलेला नसल्याचं चित्र होतं. त्यामुळे अनेक मतदारसंघांतील चित्र अजूनही अस्पष्ट आहे. मात्र आता महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला असून उद्या सकाळी ११ वाजता मविआकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
दरम्यान या पत्रकार परिषेदला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
जागावाटपावरून महाविकास आघाडीत मोठा तिढा निर्माण झाला होता. मविआतील तीन प्रमुख पक्षांची वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू होती. मात्र जागावाटप निश्चित न झाल्याने प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर सांगली आणि मुंबईतील दोन जागांवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन पक्षांत संघर्ष सुरू झाल्याने जागावाटप लांबणीवर पडले. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी आपल्या उमेदवारांची घोषणा केल्याने काँग्रेस नेत्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी तर ठाकरे यांच्या पक्षाची थेट आपल्या केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केली. मात्र जागावाटपाचा हा तिढा अखेर सुटला असल्याचं सांगण्यात येत असून उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीतील कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढणार, याबाबतची घोषणा केली जाईल.