नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार  समित्यांमध्ये आज लिलाव बंद
नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये आज लिलाव बंद
img
दैनिक भ्रमर
लासलगाव (वार्ताहर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांची नियुक्ती करू नये, या मागणीसाठी आज बाजार समिती बंदला नाशिक जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 

आज लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतीमालाचे लिलाव बंद राहणार आहेत. किमान 40 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल आज ठप्प होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात 14 कृषी उत्पन्न बाजार समिती असून सर्वच बाजार समित्या बंद आहेत. हजारो वाहनांतील कांदा आणि शेतकरी यांच्यामुळे गजबजणारी लासलगावची कांदा बाजारपेठ आज ओस पडल्याचे दिसून आले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नरेंद्र वाढवणे यांनी लासलगाव मुख्य बाजारपेठ, निफाड आणि विंचूर उपआवारावर शेती मालाचे लिलाव बंद आहेत, असे सांगितले. केंद्र सरकारने बाजार समित्यांच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा आणणारा असल्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा आजपासून बाजार समित्या बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. त्यानुसार हा बंद झाला आहे. संघटनेने पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी जलाज शर्मा, जिल्हा निबंधक फय्याद मुलानी यांना निवेदन दिले होते. 

केंद्र सरकार कृषी धोरणाबाबत चुकीचे निर्णय घेत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.  नाशिक येथे जिल्हा निबंधक फय्याज मुलाणी यांना निवेदन देताना निवृत्ती गारे, गजानन घोटेकर, संभाजी पगार, अनिल गिते आदींनी दिलेल्या निवेदनात प्रशासक मंडळ म्हणजे सात-बारा नावावर असणारे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते व निवडणुकीला देणग्या देणारे व्यापारी हेच त्या प्रशासक मंडळात असतील.

या निर्णयाने बाजार समित्यांमध्ये एकाधिकारशाही निर्माण होणार असून, बाजार समितीतील शेतकऱ्यांचे अधिकार संपुष्टात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आज करण्यात येणाऱ्या आंदोलनात बाजार समित्यांसह व्यापारी, हमाल, माथाडी कामगार, सर्व बाजार समितीचे घटक सहभागी होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल कोणत्याही बाजार समितीच्या आवारामध्ये विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन केल्यानंतर  जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे यांनी आभार मानले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group