लासलगाव शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा
लासलगाव शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा
img
Dipali Ghadwaje
लासलगाव शहर व परिसरात बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.या निमित्ताने येथील शेतकरी सुनील लूटे व परिवारातील सदस्यांनी लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या हस्ते आपल्या लाडक्या सर्जा राजाची विधिवत पूजन करून पारंपरिक वाद्य वाजवत सजवलेल्या बैलांची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली. 

पावसाळ्याचे चार महिने उलटले तरी अजूनही पुरेसा पाऊस नाही लासलगाव सह परिसरातील गावात पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे.जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. शेतमालाला समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे,  मात्र आपल्या बैलां प्रती नैराश्य न दाखवता लासलगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी पोळ्याच्या सणा निमित्त आपल्या लाडक्या बैलजोडीला लागणारा साज खरेदी करून पोळा सण उत्साहात साजरा केला. 

शेतकर्‍याचा सखा,मित्र सर्जा-राजाचा पोळ्याचा दिवस मानाचा असतो. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. श्रावणी पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना आंघोळ घातली. त्यांच्या अंगाला हिंगूळ लावले. शिंगाला रंग लावून त्याच्या अंगावर झुल टाकली,गळ्यात सुतापासून तयार करण्यात आलेल्या माळा तर पायात घुंगरू बांधले. यावेळी घरातील सुहासिनींनी बैलांची विधीवत पूजन करून त्यांना पुरण पोळीचा नैवेद्य दिला. त्यांच्या पुढे गहू-ज्वारीचे दान केले.

लासलगावसह पिंपळगाव नजीक,टाकळी(विंचूर),ब्रम्हणगाव(विंचुर)निमगाव वाकडा,वेळापूर,कोटमगाव या गावातून सुध्दा बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक पध्दतीने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शेतकऱ्यांनी पोळासण उत्साहात साजरा केला. यावेळी शेतकरी सुनील लूटे यांनी बैलांची सवाद्य मिरवणूक काढली त्याप्रसंगी उपस्थित परिवारातील सदस्य व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group