लासलगाव :- नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे भाभा अणू संशोधन केंद्राच्या कृषक विकिरण केंद्रातून आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन १ एप्रिल पासून आंबा निर्यातीला सुरवात झाली असून ७५०० बॉक्समधून २८ टन आंबा हा यूएसएला निर्यात झाल्याची माहिती लासलगाव कृषकचे अधिकारी संजय आहेर यांनी दिली. भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असते. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते व चवीला उत्कृष्ट असल्याने भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते.
जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही यंदाही लासलगाव मार्गे झाली असून आज २८ टन आंबे प्रक्रिया करून निर्यात झाले आहे. मागील वर्षी एकट्या अमेरिकेत १ हजार टन आंब्याची यशस्वी निर्यात लासलगाव येथील कृषक मधून झाली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका,ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि मलेशिया दिशेने कूच करू लागला आहेत .
लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत,हापूस या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.
लासलगाव येथे ३१ ऑक्टोंबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता कांद्या बरोबर मसाले व आंब्यावरच येथे विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.
विकिरण प्रक्रिया म्हणजे?
लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निमिर्तीची प्रक्रिया ही थांबते कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.