आज कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झाली वेतनाची रक्कम
ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहार ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पार पडत असतात. लासलगांव येथील सरपंच पदाचा वाद उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असल्याने मागील दोन महिन्यांपासुन तिढा सुटलेला नाही. ११ जानेवारी २०२४ पासुन सरपंच पदाचा राजीनामा प्रकरण सुरुवात झालेली असुन ती आजतागायत प्रलंबित आहे. यामुळे आज-उद्या निकाल येईल या भाबड्या आशेवर असलेले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे ३ महिन्यांपासुन वेतन थकलेले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ८४ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपली होती.
या कर्मचाऱ्यांनी वेतन मिळण्यासाठी वरीष्ठ कार्यालय पंचायत समिती निफाड यांच्याकडे मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न सुरु केले. प्रस्तुत प्रकरणी जिल्हा परिषदेकडुन मार्गदर्शन मिळत नसल्याचे पंचायत समिती निफाडने कळविल्याने कर्मचारी स्वतः जिल्हा परिषदेकडे जावुन मार्गदर्शन मागितले असता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मार्गदर्शन घ्या असे कळविले त्यानंतर कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गदर्शनासाठी गेले असता त्यांनी जिल्हा परिषदेकडे मार्गदर्शन मिळेल असे सुनावले असता कर्मचाऱ्यांनी दिनांक १३ मार्च पासुन कामबंद संप पुकारला होता. यावेळी कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत सदस्य आणि गावकर्यांचा पाठिंबा मिळाला.
अनेक संघटनानी देखील पाठिंबा दिला. सदरचा संप ३ दिवस सुरु असतांना जिल्हा परिषदेकडुन पंचायत समिती आणि पंचायत समितीकडुन ग्रामपंचायतीला मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दिनांक १५ मार्च रोजी गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष येवुन मार्गदर्शन केले. ग्रामविकास अधिकारी यांचे समवेत पुढील ८ दिवसांमध्ये तुमचे वेतन अदा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत असे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेले काम बंद संप मागे घेत दिनांक १६ मार्च पासुन कामास सुरवात केली होती.
दिनांक १६ मार्च २०२४ रोजी उपसरपंच रामनाथ शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मिटींग अजेंडे काढुन आज दिनांक २२ मार्च २०२४ रोजी उपसरपंच यांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग पार पडली.
सरपंच पदाच्या स्वाक्षरी बदलण्याबाबतचा विषय चर्चेसाठी घेऊन प्रभारी सरपंच रामनाथ शेजवळ यांच्या सह्यांचे नमुने बँक खात्यांना संलग्न करून आज ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात आले. यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण. झाले. सर्व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, नागरिक आणि विविध संघटनाचे आभार मानले.