लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धार्मिक दंगल उसळवण्याच्या हेतूने भडकावू विधाने केल्याप्रकरणी नितेश राणेंविरुद्ध चार पोलीस ठाण्यांत, तर गीता जैन यांच्याविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत. पोलिसांनी मंगळवारी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.
नितेश राणे, गीता जैन, टी. राजा या भाजप आमदारांनी अनेक ठिकाणी भडकावू विधाने केली. याप्रकरणी भाजप आमदारांविरुद्ध गुन्हे नोंदवून कठोर कारवाईचे निर्देश द्या, अशी मागणी करीत शिक्षिका अफताब सिद्दिकी यांच्यासह पाच जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गायत्री सिंग, अॅड. विजय हिरेमठ व अॅड. हमजा लकडावाला यांनी, तर पोलिसांतर्फे अॅड. हितेन वेणेगावकर यांनी बाजू मांडली.
जानेवारी ते मार्चदरम्यान भडकावू विधाने केल्याप्रकरणी राणेंविरुद्ध मीरा रोड, मालवणी, गोवंडी, घाटकोपर या चार पोलीस ठाण्यांत, तर गीता जैन यांच्याविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाण्यात कलम 153, 504 व 506 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत. मीरा रोड येथील हिंसाचारप्रकरणी 11 गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी भाजप आमदारांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून कलम 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल का केला नाही, असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला व याचा 12 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे खुलासा करण्याचे आदेश दिले. 19 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.