मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्ता सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पार्टी केल्याचा आरोप आ. नितेश राणे यांनी विधानसभेत केला.
सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आ. राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यासंदर्भातील फोटो दाखवत गंभीर आरोप केले. सुधाकर बडगुजर यांना कोणाचा वरदहस्त आहे, त्यांना हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली.
याच मुद्द्यावरून नाशिक जिल्ह्यातील मंत्री दादा भुसे आक्रमक झाले. ते म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महानगर प्रमुख देशद्रोहीसोबत पार्टी करत आहेत. मग या सुधाकर बडगुजर यांना वाचवण्यासाठी कोण फोन फोनी करत आहे.
देशद्रोहसोबत डान्स पार्टी करणाऱ्यांना वाचवणारी राजकीय शक्ती कोण आहे? यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? सुधाकर बडगुजर यांचे लागेबांधे कोणाशी आहे. बडगुजर हा छोटा मासा आहे. या प्रकरणात मोठ्या व्यक्तीलाही उघड करावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली,.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी हा मुद्दा लावून धरला. १९९३ मधील बाँबस्फोटातील आरोपींशी संबंध ठेवणाऱ्यांना कोण वाचवत आहे. शिवसेना भवन उडवण्याचा कट असलेला आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्यानंतर त्या व्यक्तीवर कारवाई होत नाही. या घटनांमुळे दहशतवाद्यांचा आत्मविश्वास वाढतो. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, असे शेलार यांनी म्हटले.
हा प्रकार गंभीर आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याची चौकशी होईल. ही चौकशी एसआयटीकडून करण्यात येईल. त्यासाठी एसआयटीला विशिष्ट काळाची मुदत दिली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.