राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. चितावणीखोर आणि भडखाऊ भाषण केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहमदनगरमध्ये दोन गुन्हे तर पुण्यामध्ये त्यांच्याविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नितेश राणे यांनी मुस्लिमांना मारणार असल्याची धमकी दिली होती. नितेश राणे यांनी सभेदरम्यान मुस्लिमांना जाहीर धमकी दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार नितीश राणेंनी या सभेत मुस्लिमांविरोधात चितावणीखोर वक्तव्य करत त्यांना धमकी दिली होती.
'आमच्या रामगिरी महाराजांविरोधात कोणी काही बोलले तर आम्ही मशिदींमध्ये घुसून त्यांची निवडून निवडून हत्या करू.', अशी धमकी नितेश राणे यांनी दिली होती. नितेश राणे यांच्या या चितावणीखोर वक्तव्यानंतर अहमदनगर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर श्रीरामपूर पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३५३ (२)(३), ३५२ - ३(५) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पुण्यातील तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला. नितेश राणे यांच्याविरोधात मुस्लिमांविरोधात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यामुळे आता त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.