देशद्रोह्याशी संबंध असल्याच्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर म्हणाले दाऊदचा हस्तक सलीम...
देशद्रोह्याशी संबंध असल्याच्या आरोपानंतर सुधाकर बडगुजर म्हणाले दाऊदचा हस्तक सलीम...
img
दैनिक भ्रमर

नाशिक (प्रतिनिधी) :- देशद्रोही दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याला मी ओळखत नाही, त्याचा माझा कोणताही संबंध नाही, यापूर्वीही नव्हता आणि यापुढेही नसेल, असा खुलासा शिवसेनेचे नाशिक महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत केला.

विधानसभेत आमदार नितेश  राणे यांनी शिवसेनेचे सुधाकर बडगुजर हे अंडरवर्ल्ड सलीम कुत्ता याच्यासमवेत नाचत असतानाचा व्हिडिओ व फोटो दाखवून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. त्यामुळे देशद्रोह्यांसमवेत नाचगाणी करणाऱ्या नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीबाबत एसआयटी स्थापन करण्याचा गृहमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात बोलताना बडगुजर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की 2016 मध्ये भाजपच्या विजया रहाटकर यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केल्याने याला विरोध म्हणून आम्ही शिवसैनिकांनी त्यावेळेला आंदोलन केले होते. यावेळी काही झटापटी झाल्या होत्या. या प्रकरणांमध्ये मला 14 दिवसांचा तुरुंगवास झाला होता. त्याबरोबर माझ्यासमवेत अनेक अनेक जण होते, शिवाय मध्यवर्ती कारागृहात कदाचित भेट झाली असेल याव्यतिरिक्त सलीम कुत्ता याच्याविषयी मला फारसे काही माहीत नाही. मी त्याला ओळखत नाही.

पॅरोलवर सुटलेला माणूस कुठे जाऊ शकतो, एखाद्या लग्न समारंभातही भेट झाली असेल, हा फोटो, व्हिडिओ क्रॉप केलेला आहे, हा बेबनाव असून, हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचा आरोप बडगुजर यांनी केला. माझ्या कार्यालयातून पवन मटाले या कार्यकर्त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात आपण चौकशी करणार असून, नीलेश राणे व दादा भोसले यांनी विधानभवनात सांगितलेल्या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडून अद्याप मला कोणतीही चौकशी व फोन आलेला नाही; मात्र यासंदर्भात आपण पोलिसांना योग्य ते सहकार्य करणार असल्याची ग्वाही बडगुजर यांनी दिली.

दरम्यान, हे वृत्त प्रसारित होताच शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेचे पदाधिकारी जमा झाले. त्यानंतर काही वेळातच सुधाकर बडगुजर थोड्या वेळातच या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत त्यांना समर्थन दिले.

या पत्रकार परिषदेप्रसंगी शिवसेनेचे नेते सुनील बागूल, दत्ता गायकवाड, विजय करंजकर, देवानंद बिरारी, नीलेश साळुंके, विलास शिंदे, सचिन मराठे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्या
Join Whatsapp Group