नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि जमाती आरक्षणातील क्रिमी लेयरबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात देशभरातील विविध संघटनांनी आज (21 ऑगस्ट) ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. एससी, एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली.
उपेक्षित समुदायांना अधिक मजबूत प्रतिनिधित्व आणि संरक्षण मिळावे या मागणीसाठी देशभरातील दलित आणि आदिवासी संघटना आज ‘भारत बंद’ पाळणार आहेत. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ दलित अँड आदिवासी ऑर्गनायझेशन्सने (एनएसीडीएओआर) आपल्या मागण्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी न्याय आणि समानतेच्या मागण्यांचा समावेश आहे.
भारत बंदचं कारण काय?
सुप्रीम कोर्टातील सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे संघटना नाराज झाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा निकाल ऐतिहासिक इंदिरा सहानी खटल्यातील नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालाला कमकुवत करत आहे. इंदिरा सहानी खटल्याच्या निकालाने भारतात आरक्षणाची चौकट स्थापन केली होती. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या घटनात्मक अधिकारांना धोका असल्याने सुप्रीम कोर्टाने नुकताच दिलेला निर्णय रद्द करण्याची विनंती एनएसीडीएओआरने सरकारला केली आहे.
काय मागणी आहे?
एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासाठी संसदेने नवीन कायदा मंजूर करावा आणि त्याचा संविधानाच्या नवव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करून संरक्षित करावं, अशी देखील मागणी संघटना करत आहे. सुप्रीम कोर्टाने कोट्याबाबत दिलेला निर्णय मागे घ्यावा किंवा फेरविचार करावा, अशीही मागणी आहे.
भारत बंदमध्ये कोणाचा सहभाग?
या भारत बंदला किमान तीन राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळाला आहे. मायावतींचा बहुजन समाज पार्टी (बसपा), हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) आणि लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) या बंदला पाठिंबा देत आहेत. याशिवाय भीम आर्मीनेही या बंदला पाठिंबा दिला आहे.
कशावर होणार परिणाम?
हा बंद देशव्यापी आहे. पण, राजस्थान, केरळ, उत्तर प्रदेश आणि बिहारला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. या राज्यांमध्ये बंदला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील जयपूर, दौसा, भरतपूर, डीग आणि गंगापूर या जिल्ह्यांतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
कोणत्या सेवा बंद किंवा सुरू असणार?
भारत बंद दरम्यान काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रुग्णालयं, रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा यांसारख्या आपत्कालीन सेवा सुरू राहतील. बँका आणि सरकारी कार्यालयं बंद ठेवण्याबाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याचा अर्थ या सेवा देखील सुरू राहतील. शैक्षणिक संस्थाही सुरू असतील.