इस्रायल आणि हमासदरम्यान चालू असलेलं युद्ध तात्पुरतं थांबलं आहे. इस्रायल सरकार आणि हमासदरम्यान ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेसाठी शस्त्रविराम घोषित केला आहे. हा शस्त्रविराम वाढण्याची मागणी होत आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रयत्न होत आहेत. नियोजित करारानुसार हा शस्त्रविराम सोमवारी संपुष्टात येणार होता. त्याला आधी दोन आणि नंतर एक दिवसाची मुदतवाढ मिळाली आहे. अद्याप हमासच्या ताब्यातील सर्व ओलिसांची सुटका झालेली नाही, त्याचबरोबर इस्रायलच्या ताब्यात बरेच पॅलेस्टिनी कैदी आहेत. त्यांच्या सुटकेसाठी शस्त्रविराम वाढवण्यात आला आहे. अशातच दहशतवाद्यांनी दगाबाजी करत इस्रायलला मोठा धक्का दिला आहे.
शस्त्रविरामादरम्यान, इस्रायलच्या जेरुसलेममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. दोन हल्लेखोरांनी जेरुसलेमधील सततची रहदारी असलेल्या एका रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिक ठार झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी ७.४० वाजता हा हल्ला झाला. विजमन स्ट्रीटवरील बस स्टॉपजवळ दोन पॅलेस्टिनी हल्लेखोर एका गाडीतून उतरले आणि त्यांनी रस्त्यावरच्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन इस्रायली नागरिक जागीच ठार झाले आहेत. तर आठ जण जखमी झाले आहेत. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमी नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहेत.
हल्लेखोर अंदाधुंद गोळीबार करत असताना विजमन स्ट्रीटवर उभ्या असलेल्या ऑफ ड्युटी जवानांनी आणि नागरिकांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही हल्लेखोर मारले गेले. इस्रायली सुरक्षा एजन्सी शिन बेतने दिलेल्या माहितीनुसार मुराद नाम्र (३८) आणि इब्राहिम नाम्र (३०) अशी हल्लेखोरांची नावं आहेत. हे दोन्ही हल्लेखोर हमासशी संबंधित आहेत. दहशतवादी कारवायांमधील सहभागामुळे या दोघांनी यापूर्वी तुरुंगवास भोगला आहे.
दरम्यान, या हल्ल्याच्या काही वेळ आधी इस्रायलमधल्या जेरुसलेम शहरातील ओल्ड सिटीमधील पवित्र धार्मिक स्थळावर तीन दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन पोलिसांचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस चकमकीत तिन्ही दहशतवादी ठार झाले. हल्लेखोर हे पूर्व इस्रायलचे रहिवासी होते अशी माहिती समोर आली आहे.