केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी परदेशात कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या गाड्यांना भारतात विरोध दर्शवला आहे. आपण मंत्री असेपर्यंत या गाड्या भारतात येणार नसल्याचे त्यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात सांगितले. भारतात ड्रायव्हरलेस आणि ऑटोनॉमस गाड्यांना आपण मंत्री असेपर्यंत परवानगी देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या गाड्या भारतात आल्या तर ८० लाख लोकांचा रोजगार जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. त्यात सुमारे दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. यामुळे देशाच्या जीडीपीचे 3.8% नुकसान होते. रस्ते अपघातात मृत्यू होणारे 60 टक्के युवावर्ग आहे. या अपघातांसाठी चार कारणे आहेत. एक ऑटोमोबाइल इंजीनिअरिंग, दुसरा रोड इंजीनिअरिंग, तिसरे इंफोर्समेंट आणि एजुकेशन याचा समावेश आहे.लोकांना जागृत करुन 2030 पर्यंत रस्ते अपघातांची संख्या 50 टक्के कमी करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. त्याचवेळी इतर तीन मार्गांवर काम सुरु आहे.
कारमध्ये सहा एअरबॅग बसवणे, रस्त्यांवर ब्लॅक स्पॉट कमी करणे तसेच मोटर व्हेकल अधिनियमानुसार दंड वाढवण्याचा समावेश आहे. महामार्गांवर रुग्णवाहिका आणि क्रेन ठेवली आहे. यामुळे गरज पडल्यास त्याचा लागलीच वापर करत येईल. तसेच भारतातील ७० ते ८० लाख लोक चालक म्हणून व्यवसाय करतात. भारतात चालकविरहीत कार आल्या तर त्यांचा रोजगार जाईल.
टेस्लाचे भारतात विक्रीसाठी चीनमध्ये मॅन्युफॅक्चरीग करणे स्वीकारता येणार नाही. आम्ही चीनमध्ये निर्मिती करुन भारतात विक्रीसाठी टेस्लाला परवानगी देणार नाही. टेस्लाचे भारतात स्वागत करु, परंतु निर्मिती भारतातच झाली पाहिजे, असेही त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.