'ईव्हीएमने निवडणूक होतेय मॅनेज',नागपुर मतदारसंघात चारशेच्या वर उमेदवार उभे करणार, सुनील केदारांचं वक्तव्य
'ईव्हीएमने निवडणूक होतेय मॅनेज',नागपुर मतदारसंघात चारशेच्या वर उमेदवार उभे करणार, सुनील केदारांचं वक्तव्य
img
दैनिक भ्रमर
नागपूर : लोकसभा निवडणूक आता अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. अशात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएमवर बंदी घालून मतपत्रिकांवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, ही मागणी सातत्याने फेटाळली जात असल्यानं आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमने नवा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेच्या एका मतदारसंघात 384 पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. त्यामुळे इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम संघटनेच्यावतीने नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी 400 उमेदवार उभे केले जातील, अशी माहिती माजी मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. ईव्हीएमच्या वापराबाबत अनेक तक्रारी आहेत.

दरम्यान सुनील केदार म्हणाले, की ईव्हीएमच्या वापराने निकाल फिरविता येत असल्याने मतदानावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. वारंवार तक्रारी करून देखील निवडणूक आयोग त्याची दखल घेत नाही. 

देशातील निवडणूक प्रक्रिया ही निष्पक्ष आणि पारदर्शी असणं आवश्यक असताना निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचंही ते म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच अधिकाधिक उमेदवार उभे करण्याचा पवित्रा घेतला आहे. अशातच आता इंडिया अगेन्स्ट ईव्हीएमच्या या निर्णयानंतर निवडणूक यंत्रणेवरील ताण वाढण्याची चिन्हं आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group