महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आतापर्यंत 9 दिवस पूर्ण झाले आहेत. पण महाराष्ट्रात सत्ता स्थापन झालेलं नाही. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. पण तरीही सरकार स्थापन होण्यास विलंब होताना दिसत आहे.
भाजप नेत्यांकडून येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम पार पडेल, असं जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार तयारीदेखील सुरु झाली आहे. एकीकडे या सगळ्या घडामोडी सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
‘राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर’
“राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आणि नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. “नगरसेवकाला, आमदारकीची आशा, तर आमदाराला मंत्रिपदाची अपेक्षा, मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्षश्रेष्ठी कधी बाजूला करतील, याची भीती”, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे.
नितीन गडकरी म्हणाले “राजकार हे अंतुष्ट आत्म्यांचं महासागर आहे. इथे सर्वच जण दु:खी आहे. नगरसेवक यासाठी दु:खी आहे की, त्याला आमदारकी मिळाली नाही. आमदार यासाठी दु:खी आहे की त्याला मंत्रिपद मिळालं नाही. जो मंत्री बनलाय तो त्याला चांगलं खातं मिळालं नाही यासाठी दु:खी आहे, त्यानंतर तो यासाठी दु:खी आहे की, त्याला मंत्रिपद मिळालं नाही. मुख्यमंत्री यासाठी टेन्शनमध्ये आहे की, हायकमांड कधी ठेवणार आणि कधी काढून टाकणार? याचा भरोसा नाही”.